लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हेगारांना धडकी भरविणारी कारवाई करून हत्येचे गुन्हे महाराष्ट्रात सर्वात कमी करण्याची प्रशंसनीय कामगिरी भंडाऱ्याचे पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी बजावली आहे. यामुळे राज्य पोलिस दलात भंडारा पोलिसांची कामगिरी 'मॉडेल' म्हणून राज्यात चर्चेला आली आहे.
महाराष्ट्रात हल्ली किरकोळ कारणावरून हत्येचा गुन्हा घडतो. पोलिसांचा नेभळटपणा त्यासाठी कारणीभूत मानला जातो आणि तशी टीकाही राज्यातील पोलिसांवर हत्येच्या गुन्ह्यांनंतर केली जाते. गुटखा आणि रेती माफियांचे वर्चस्व असलेला जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या भंडारा जिल्ह्यातही असेच चित्र होते. भंडारा जिल्ह्यात गुन्हेगारी मोकाट सुटल्यासारखी झाली असताना २०२२ मध्ये हत्येचे ३४ गुन्हे घडले होते. त्यानंतर येथे एसपी म्हणून नुरुल हसन रुजू झाले आणि सर्वप्रथम आपल्या जिल्ह्यातील पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचेच त्यांनी ऑडिट केले. गुन्हेगारांशी कसलेही संबंध ठेवायचे नाही आणि हाती सापडलेल्या गुन्हेगारांवर कसलीही दयामाया दाखवायची नाही, असा मंत्र भंडारा पोलिसांना देऊन त्यांनी गुन्हेगारांचे कंबरडे मोडणारी कारवाई सुरू केली. त्यामुळे २०२४ मध्ये हत्येचे गुन्हे १३ वर आले.
राज्य पोलिस दलात कौतुक
हत्या आणि बलात्काराचे गुन्हे घडू नये, अशी सर्वच नागरिकांची इच्छा असते. सर्वसामान्य नागरिकांची हीच इच्छा भंडाऱ्याचे अधीक्षक नुरुल हसन यांनी पूर्ण केली आहे. भंडारा जिल्ह्यात प्रभावी आणि परिणामकारक पोलिसिंग कशाला म्हणतात हे दाखवून दिल्यामुळे भंडारा पोलिसांचे राज्य पोलिस दलात चांगलेच कौतुक होत आहे.
गतवर्षात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ८२ हत्या
शीर्षस्थ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यंदा महाराष्ट्रात एकूण १८९७ हत्येचे गुन्हे घडले. त्यातील वर्षभरात सर्वाधिक ८२ हत्या पुणे जिल्ह्यात झाल्या. अहिल्यानगर जिल्ह्यात ७४ गुन्हे, नांदेड ६७, यवतमाळ ६५, सांगली जिल्ह्यात ६१, जळगाव ६०, नाशिक जिल्ह्यात हत्येचे ५९, सोलापूर जिल्ह्यात ५९ गुन्हे, कोल्हापूर ५१, बुलढाणा जिल्ह्यात ५३ आणि नागपूर जिल्ह्यात हत्येचे ४८ गुन्हे घडले.
३४ वरून १० वर आले खून
हद्दपारी, मकोकासारख्या धडाकेबाज कारवाया करतानाच सराईत गुन्हेगारांना धडकी भरेल, अशी कारवाई त्यांनी सुरू केली. परिणामी २०२५ या वर्षभरात हत्येच्या गुन्ह्याचा आकडा १० वर आला आहे.
"पोलिस महासंचालक, तसेच अन्य वरिष्ठांकडून दर आठवड्याच्या मीटिंगमध्ये मार्गदर्शन मिळते. त्या आधारे जिल्ह्यातील सहकाऱ्यांच्या मदतीने आवश्यक ते प्रयत्न केले. नागरिकांची त्यात मदत मिळाली. त्यामुळे गुन्हेगारी नियंत्रित करण्यात यश मिळाले."- नुरूल हसन, पोलिस अधीक्षक, भंडारा
Web Summary : Bhandara police, under SP Nurul Hasan, significantly reduced murder rates. Audits, strict action against criminals, and public support led to a drop in murders from 34 to 13, making it a model for Maharashtra.
Web Summary : एसपी नूरुल हसन के नेतृत्व में भंडारा पुलिस ने हत्या की दर में भारी कमी की। ऑडिट, अपराधियों के खिलाफ सख्त कार्रवाई और जन समर्थन से हत्याएं 34 से घटकर 13 हो गईं, जिससे यह महाराष्ट्र के लिए एक मॉडल बन गया।