थरार दहीहांडीचा : एकावर एक सात थर अन् गोविंदा झुलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 10:47 PM2019-08-24T22:47:58+5:302019-08-24T22:54:45+5:30

दहीहांडी शिवाय श्रीकृष्ण जन्माष्टमी अधुरीच ठरते. अशा या सोहळ्याचा थरार शनिवारी इतवारी येथील सराफा ओळी, माधवराव मुकाजी खुळे चौकात अनेकांना अनुभवता आला.

Tharar Dahihandi: Seven layers on one and Govinda hanging | थरार दहीहांडीचा : एकावर एक सात थर अन् गोविंदा झुलला

थरार दहीहांडीचा : एकावर एक सात थर अन् गोविंदा झुलला

googlenewsNext
ठळक मुद्देपुरुषांच्या गटात जय भोलेश्वर क्रीडा मंडळाने फोडली दहीहांडीमहिलांच्या गटात राधाकृष्ण महिला मंडळाने मारली बाजी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा अन् दहीहांडीची स्पर्धा यांचे अतूट असे नाते आहे. किंबहुना, दहीहांडी शिवाय श्रीकृष्ण जन्माष्टमी अधुरीच ठरते. अशा या सोहळ्याचा थरार शनिवारी इतवारी येथील सराफा ओळी, माधवराव मुकाजी खुळे चौकात अनेकांना अनुभवता आला.


या दहीहांडी उत्सवात महिलांच्या गटात तीन पथक आणि पुरुषांच्या गटात नऊ पथकांनी सहभाग घेतला. पुरुषांची दहीहांडी फेरी संध्याकाळी ७ वाजतापासून रंगली आणि बघण्यास आलेल्या नागरिकांचा जल्लोष सातत्याने वाढत गेला. सर्व पथकांनी एक एक करून आपले मनोरे उभे केले. मात्र, कुणाच्याच हातात यश पडले नाही. अखेर, दहीहांडीची उंची कमी करण्यात आली. तरी देखील दहीहांडी फोडली जाईल की नाही, अशी शंका निर्माण झाली होती. मात्र, सक्करदरा, न्यू सोनझारीनगरच्या जय भोलेश्वर दहीहांडी क्रीडा मंडळाच्या ३५ ते ४० गोविंदाच्या पथकाने अत्यंत नियोजनबद्ध शैलीमध्ये मनोरे रोवले. या मनोऱ्यांचा पाया अगदी भक्कम करून, त्यावर एक-एक असे सात थर रचले आणि दहीहांडी फोडणास तत्पर असलेल्या अमित बबलू भैरे या गोविंदाने दहीहांडी हातात घेतली. मात्र, तोल गडबडण्याची चिन्हे दिसताच, त्याने दहीहांडीच्या दोराला पकड मजबूत केली आणि त्याला लटकून तेथेच तो कवायती करायला लागला. इकडे मात्र अनेकांच्या मनात धडकी भरली होती. दहीहांडीच्या दोन्ही टोकाला असलेल्या नियोजकांनी दोरी हळूहळू खाली उतरवत एकटाच लटकलेल्या कन्हैयाला सकुशल उतरवले आणि एकच जल्लोष झाला. ‘जय कन्हैया लाल की, हाथी घोडा पालखी’च्या गजरात आयोजकांसह विजेत्या पथकाने जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली. विजेच्या पथकाला भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष प्रवीण दटके, जयप्रकाश गुप्ता यांच्या हस्ते विजेतेपदाचा ‘स्व. प्रल्हादराव शिवनारायण अग्रवाल स्मृती गोविंदा’चषक प्रदान करण्यासोबतच २ लाख ५१ हजार रुपयाची विजयी राशी प्रदान करण्यात आली.
तत्पूर्वी महिलांच्या दुपारी ४ वाजताच्या सुमारास पार पडलेल्या दहीहांडी उत्सवात सोनेगाव येथील राधाकृष्ण महिला मंडळाच्या पथकातील गोपिकांनी बाजी मारली. विजेत्या पथकाला ‘स्व. भागीरथाबाई गोपाळराव मते स्मृती गोपिका’ चषक प्रदान करण्यासोबतच ५१ हजार रुपये विजयी राशी सविता मोहन मते व शैलजा खुळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी, डीसीपी गुन्हे नीलेश भरणे, माजी मंत्री अनिस अहमद, उत्सवाचे संयोजक संजय खुळे उपस्थित होते. या संपूर्ण सोहळ्याला माजी आ. मोहन मते, आ. विकास कुंभारे, माजी खा. अविनाश पांडे, आ. गिरीश व्यास, नगरसेवक दयाशंकर तिवारी, रमेश पुणेकर, संजय महाजन, एसीपी राजदत्त बनसोड, एसीपी शशिकांत महावतकर, ज्ञानेश्वर काटोले, राजू हरडे, महेंद्र पळसापुरे, कुणाल गडेकर, नीरज जैन, रिंकू जैन, ऋषीकेश खुळे, अभिषेक लुनावत, रितेश सोनी, पवन हटवार, राजू जैन उपस्थित होते.
मी कन्हैया हाव न जी! - अमित भैरे
दहीहांडी फोडणाऱ्या पथकाचा हांडी फोडणारा गोविंदा अमित बबलू भैरे याला.. एकटाच लटकून राहिल्याची भीती वाटली नाही का, असा प्रश्न विचारला असता.. मी कन्हैया हाव न जी, मंग कायची भीती! असे उत्तर देत संपूर्ण गोविंदांना स्फुरण चढवले.
सात थर रचून प्रथमच दहीहांडी फोडण्याचा दावा
विजेत्या पथकाचे सिनियर गोविंदा संग्राम भिमारे यांनी, सात थर रचून, त्यावर गोविंदा नाचण्याची ही पहिलीच वेळ असल्याचा दावा केला. आतापर्यंत पाच-सहा थरापर्यंत मनोरे रचून दहीहांडी फोडण्याचा पराक्रम अनेक गोविंदा पथकाने केले असून, आम्ही नवा विक्रम स्थापित केल्याचा दावा भिमारे यांनी केला.

Web Title: Tharar Dahihandi: Seven layers on one and Govinda hanging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.