सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
By योगेश पांडे | Updated: May 2, 2025 22:47 IST2025-05-02T22:46:38+5:302025-05-02T22:47:28+5:30
सहा तासांच्या आत दोन बहिणींना शोधण्यात पोलिसांना यश

सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: एरवी दहावी-बारावी किंवा इतर प्रवेश परीक्षांच्या निकालातून विद्यार्थी तणावात आल्याचे दिसून येतात. मात्र वाढत्या स्पर्धेत चक्क सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’ घेत एक १२ वर्षीय मुलगी घर सोडून निघून गेली. जाताना सोबत तिने चार वर्षांच्या बहिणीलादेखील सोबत घेतले होते. मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे सहा तासांच्या आत त्यांना शोधण्यात यश आले. या प्रकारामुळे पोलीस यंत्रणेची चांगलीच धावपळ झाली. मात्र काही अनुचित व्हायच्या आत मुलींना पालकांच्या हवाली करण्यात आले. गुरुवारी नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
१२ वर्षीय मुलीचे आईवडील दोघेही खाजगी नोकरी करतात व मध्यमवर्गीय कुटुंब आहे. तिचा शुक्रवारी सातव्या इयत्तेचा निकाल लागणार होता. यामुळे तिला तणाव आला होता. ती तिच्या ४ वर्ष वयाच्या बहिणीला घेऊन सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास आजी आजोबांसोबत उद्यानात खेळायला जात आहे असे सांगून घरातून निघाली. मुली उशीरापर्यंत घरी परत न आल्याने घरच्यांनी शोध घेतला. अखेर पालकांनी नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार केली. यानंतर पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली. सोशल माध्यमांमध्ये तातडीने संपूर्ण माहिती शेअर करण्यात आली.
तसेच सीसीटीव्ही फुटेज युद्धपातळीवर तपासण्यात आले. मुली राधाकृष्ण गार्डन ईष्वर नगर, गुरूदेव नगर, तिरंगा चौक, गजानन चौक, हेडगेवार चौक, जनरल आवारी चौक या मार्गाने पायी जात असल्याचे फुजेटमध्ये दिसून आले. त्या रेल्वे स्थानकात असल्याची माहिती मिळाल्यावर सहायक पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरे हे पथकासह होम प्लॅटफॉर्मवर पोहोचले. तेथे त्यांना मुली सुखरूप आढळल्या. त्यांना नंदनवन पोलीस ठाण्यात नेण्यात आले व त्यांचे समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर त्यांना त्यांच्या पालकांच्या हवाली करण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत पाटील, राहुल शिरे, मुकुंद ठाकरे, पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे, दिगंबर बोरकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
भिती वाटल्याने घराकडे परतल्याच नाही
सायंकाळी सहा ते नऊ या कालावधीत त्या नागपुरातील रस्त्यांवर चालत होत्या. मात्र आता इतक्या उशीरा घराकडे परत गेलो तर घरचे रागावतील अशी भिती वाटली. त्यामुळे मुलगी चिमुकल्या बहिणीला घेऊन रेल्वे स्थानकाच्या आत जाऊन बसली. पोलिसांनी तिला विचारणा केली असता सुरुवातीला तिने अज्ञात व्यक्तीने कारमध्ये बसविल्याची बतावणी केली. मात्र त्यानंतर तिने सत्य सांगितले. ते ऐकून पोलिसांनादेखील आश्चर्याचा धक्काच बसला.