विमानतळ परिसरातील उंच-उंच इमारती, लँडिंग अन् टेक ऑफ, धोका होत आहे दुर्लक्षित

By नरेश डोंगरे | Updated: June 12, 2025 22:43 IST2025-06-12T22:42:42+5:302025-06-12T22:43:03+5:30

गुजरातमधील दुर्घटनेमुळे पुन्हा चर्चा

Tall buildings in the airport area, landing and take-off, the danger is being ignored | विमानतळ परिसरातील उंच-उंच इमारती, लँडिंग अन् टेक ऑफ, धोका होत आहे दुर्लक्षित

विमानतळ परिसरातील उंच-उंच इमारती, लँडिंग अन् टेक ऑफ, धोका होत आहे दुर्लक्षित

- नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गुजरातमधील विमानाच्या भीषण दुर्घटनेमुळे नागपुरातील विमानतळानजीकच्या उंच-उंच इमारती पुन्हा एकदा 'फोकसमध्ये आल्या आहेत. या इमारतीच्या आजूबाजूने रोज मोठ्या प्रमाणात येथील विमानतळावर विमाने उतरतात आणि झेपावतात.

देशात वेगाने विकसित होणारे शहर म्हणून नागपूरचे नाव घेतले जाते. शहर चारही दिशांनी झपाट्याने वाढत असले तरी शहराचा दक्षिणेकडील भाग अधिकच वेगाने विकसित होत आहे. मोठमोठ्या शिक्षण संस्था, आरोग्य संस्था या भागात आल्या आहेत. रोज नवनव्या गृह प्रकल्पांची पायाभरणी या भागात होत असून, आज घडीला अनेक गगनचुंबी इमारती विमानतळाच्या आजूबाजूला असलेल्या न्यू मनीषनगर, चिंचभवन, सोनेगाव, प्रतापनगर भागात निर्माण झाल्या आहेत. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विमानांची तास ये-जा सुरू असते. विशेष म्हणजे, धावपट्टीवर उतरणारी विमाने चिंचभुवन उड्डाणपुलाकडून येतात आणि जाणारी विमाने सोनेगाव, प्रतापनगर दिशेने झेपावतात. या दोन्ही दिशांना अनेक मोठ्या इमारती उभ्या झाल्या असून, अनेक बहुमजली इमारतींचे निर्माण कार्य सुरू आहे. या इमारतींमुळे विमान उतरताना किंवा झेपावताना धोका होऊ शकतो, अशी भीती वारंवार व्यक्त केली जाते.

हाइट इन्स्ट्रक्शन्स, तरीसुद्धा..

या पार्श्वभूमीवर, काही वर्षांपूर्वी त्या भागातील नवनिर्मित इमारतींना विशिष्ट मजल्यापेक्षा जास्त उंचीच्या बांधकामाची परवानगी देण्यात येऊ नये, अशी सूचनाही (हाइट इन्स्ट्रक्शन्स) बांधकाम व्यावसायिकांना देण्यात आली होती. मात्र, तरीदेखील अनेक बहुमजली इमारती या भागात उभ्या झाल्या असून, अनेक इमारतींचे काम सुरू आहे. मुंबईच्या एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकांनीदेखील अशाच प्रकारे न्यू मनीषनगरमध्ये बहुमजली इमारत उभी केली होती. या बांधकामाला आक्षेप घेण्यात आला होता. नंतर मात्र बरीच चर्चा, धावपळ झाली आणि नंतर प्रकरण निस्तरले गेले.

परवानगी घेऊनच बांधकाम
उंच इमारतीमुळे विमान दुर्घटनेचा धोका होण्याची भीती व्यक्त केली असल्याने क्रेडाईचे अध्यक्ष गाैरव अग्रवाल यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, विशिष्ट उंचीच्या नंतर बांधकाम करायचे असेल तर अशा इमारतीच्या बांधकामासाठी एअरपोर्ट अॅथॉरिटीची परवानगी घ्यावी लागते. फनल (सर्कल)च्या आतमध्ये प्रतिबंध असतो. मात्र, सर्कलच्या आतमध्ये नसेल तर अडचण नसते. त्यामुळे सर्व भागात परवानगी घेऊनच बांधकाम केले जाते, असे अग्रवाल यांनी सांगितले.
 

Web Title: Tall buildings in the airport area, landing and take-off, the danger is being ignored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.