दिवाळीत फुप्फुसाची घ्या काळजी; फटाके, साफसफाई, पेंटिंगच्या वासापासून दूर राहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2022 20:54 IST2022-10-15T20:52:15+5:302022-10-15T20:54:04+5:30
Nagpur News फटाक्यांच्या लखलखत्या रोषणाईतून निघणाऱ्या विषारी वायूमुळे दम्याचा अटॅक येण्याचा धोका होऊ शकतो. यामुळे अस्थमा म्हणजेच दमा असलेल्या रुग्णांनी या दिवसांत विशेष काळजी घ्या, असे आवाहन श्वसनरोग तज्ज्ञांनी केले आहे.

दिवाळीत फुप्फुसाची घ्या काळजी; फटाके, साफसफाई, पेंटिंगच्या वासापासून दूर राहा
नागपूर : दिवाळीच्या दिवसांत फुप्फुसाचे आजार वाढतात. या दिवसांत घराची साफसफाई करताना, पेंटिंग करताना आणि फटाक्यांच्या लखलखत्या रोषणाईतून निघणाऱ्या विषारी वायूमुळे दम्याचा अटॅक येण्याचा धोका होऊ शकतो. यामुळे अस्थमा म्हणजेच दमा असलेल्या रुग्णांनी या दिवसांत विशेष काळजी घ्या, असे आवाहन श्वसनरोग तज्ज्ञांनी केले आहे.
फटाके फोडण्याचे घातक परिणाम लोकांना समजून घेण्याची नितांत गरज आहे. चेस्ट फिजीशियन व फुप्फुसरोग तज्ज्ञ डॉ.आकाश बलकी म्हणाले, फटाक्यांच्या धुरातून विविध घातक रसायन निघतात. हवेतील प्रदूषणात वाढ होऊन श्वसनाच्या रुग्णांत दुपटीने वाढ होते. फटाक्यातील प्रदूषित धुरामुळे ब्रांकायटीस, रायनायटीस, फॅटिंगजायटी यांसारखे आजार वाढतात.
- हवेत १० मायक्रोमीटरपेक्षाही कमी व्यासाचे कण
डॉ.बलकी म्हणाले, हवेतील १० मायक्रोमीटर (पीएम १०) आणि त्यापेक्षा कमी व्यासाचे कण हे सर्वात हानिकारक मानले जातात. हे कण शरीरातील फिल्टर टाळू शकतात आणि संपूर्ण श्वसन प्रणालीमधून जातात. जेव्हा हवेत वायूंसोबत या कणांची संख्या वाढते, तेव्हा दमा, ‘सीओपीडी’, ‘यूआरटीआय’, ‘ब्राँकायटिस’ची शक्यता वाढते. हवेतील प्रदूषणामुळे मानसिक आजारापासून ते कॅन्सरपर्यंतचे आजार होण्याची भीती असते. याचा सर्वाधिक प्रभाव लहान मुले, दमा व श्वसनाचे आजार असलेल्या व लोक, वयोवृद्धांवर होतो.
- धुक्याच्या सतत संपर्कात राहू नका
धुक्याच्या सतत संपर्कात राहिल्याने फुप्फुसाचे आजार, हृदयविकार आणि पक्षाघात होऊ शकतो. यामुळे श्वसन व दम्याच्या रुग्णांनी दारे आणि खिडक्या बंद असलेल्या व एअर कंडिशनिंग चालू असलेल्या खोलीत बसायला हवे. फुप्फुसाच्या दीर्घकालीन आजारावर नियमित उपचार घ्या.
-दिवाळीत फुप्फुसाचा रक्षणासाठी हे करा
घरातील प्रदूषण आटोक्यात ठेवण्यासाठी घरात मेणबत्त्या, दिवे लावणे टाळा. फटाके फोडणाऱ्या ठिकाणापासून दूर राहा. घराबाहेर पडताना प्रदूषण विरोधी ‘मास्क’ घाला. रुग्णांनी आपत्कालीन औषधे, नेब्युलायझर आणि इतर वैद्यकीय किट जवळ ठेवा. दम्याच्या रुग्णांनी ‘रेस्क्यू इनहेलर’ जवळ ठेवा. फळे, भाज्या, पौष्टिक अन्न खा. भरपूर पाणी प्या.
-या लक्षणांकडे दुर्लक्ष नको
हवेतील प्रदुषणामुळे दम लागणे, छातीत टोचल्यासारखे वाटणे, घशात सुज येणे, सर्दी आणि प्रचंड शिंका येणे, जीव घाबरणे, ॲलर्जीक खोकला येणे, छातीत घरघर होणे आदी लक्षणे दिसताच, डॉक्टरांचा सल्ला घ्या. या दिवसांत अस्थमाच्या रुग्णांनी डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे महत्त्वाचे ठरते.
- डॉ.आशका बलकी, फुप्फुस रोग तज्ज्ञ