तडीपार गुंडाची दादागिरी, हॉटेलमालकाला खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी

By योगेश पांडे | Updated: April 19, 2023 17:18 IST2023-04-19T17:16:59+5:302023-04-19T17:18:29+5:30

गणेशपेठ पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल

Tadipaar goon threatens to kill hotel owner and demanding ransom | तडीपार गुंडाची दादागिरी, हॉटेलमालकाला खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी

तडीपार गुंडाची दादागिरी, हॉटेलमालकाला खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी

नागपूर : तडीपार होऊन परत आल्याचा दावा करत एका गुंडाने दादागिरी करत एका हॉटेलमालकाला खंडणीची मागणी केली व जीवे मारण्याची धमकी दिली. रेल्वे स्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली. गणेशपेठ पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताहीर हुसैन मोहम्मद सलिम (३५, हंसापुरी) यांचे रेल्वे स्थानकाच्या पुर्व प्रवेशद्वाराजवळ राजा रेस्टॉरेन्ट ॲंड भोजनालय आहे. १७ एप्रिल रोजी ते रात्री साडेआठच्या सुमारास हॉटेलमध्ये बसले असताना मोहम्मद शकील मोहम्मद अली (२५, लोधीपुरा), मोहम्मद रिजवान उर्फ टेडी हसन अंसारी (२५, लोधीपुरा), रितीक राजकुमार गौर (२६, बजेरिया चौक) व फैजान खान उर्फ राजा काल्या ठ(२७, तहसील) हे तेथे आले. मोहम्मद शकीलने ताहीर हुसैनला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

मी आत्ताच तडीपारीतून परत आलो आहे. तुझ्या भावाने माझ्याविरोधात तक्रार केली होती. त्याला कोर्टातून प्रकरण मागे घेण्यास सांग. हा माझा भाग असून पाच हजार खंडणी दिली नाही तर तुझा जीव घेईन, अशी त्याने धमकी दिली. ताहीर यांनी त्याला ५ हजार रुपये दिले व त्यानंतर १८ एप्रिल रोजी गणेशपेठ पोलीस ठाणे गाठून आरोपींविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी चारही आरोपींविरोधात गुन्हा नोंदवत मोहम्मद शकील, रिजवान व रितीक गौरला अटक केली आहे

Web Title: Tadipaar goon threatens to kill hotel owner and demanding ransom