संशयाने प्रेयसीवर चाकूहल्ला करत जीव घेण्याचा प्रयत्न, काही वेळाने स्वतःचा गळा चिरत केली आत्महत्या
By योगेश पांडे | Updated: December 4, 2025 16:49 IST2025-12-04T16:48:25+5:302025-12-04T16:49:53+5:30
Nagpur : मनात संशयाचे भूत शिरल्याने प्रियकराचे स्वत:वरील नियंत्रण सुटले व त्याने संतापाच्या भरात प्रेयसीवर चाकू हल्ला करत तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला.

Suspicious, he stabbed his girlfriend, then later committed suicide by slitting his own throat.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनात संशयाचे भूत शिरल्याने प्रियकराचे स्वत:वरील नियंत्रण सुटले व त्याने संतापाच्या भरात प्रेयसीवर चाकू हल्ला करत तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर घाबरलेल्या प्रियकराने स्वत:चा गळा चिरत आत्महत्या केली. नागपुरातील नंदनवन कॉलनी परिसरात ही घटना घडली असून यामुळे खळबळ उडाली आहे.
२५ वर्षीय आरोपी बालाजी कल्याणे (२५, मुदखेड, नांदेड) हा मुळचा नांदेड जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याचे परिचयातील २२ वर्षीय मुलीशी प्रेमसंबंध होते. तो पोलीस भरतीची तयारी करत होता व मुलीला नागपुरात बीएएमएस अभ्यासक्रमात प्रवेश मिळाला होता. दोघेही नागपुरातील नंदनवन परिसरात वेगवेगळ्या खोल्या भाड्याने घेऊन राहत होते. मागील काही दिवसांपासून आरोपी तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता व तिच्या वर्गमित्रासोबत तिचे प्रेमप्रकरण सुरू असल्याचा आरोप करत होता. बुधवारी रात्री तरुणी त्याच्या नंदनवन कॉलनीतील घरी गेली होती. तेथे त्यांच्यात वाद झाला व संतापलेल्या आरोपीने तिच्यावर चाकूने वार केले. तिच्या अंगातून रक्त येत असल्याचे पाहून तो घाबरला व त्याने चाकूने स्वत:च्याच गळ्यावर वार केले. पहाटे हा प्रकार उघडकीस आला. तातडीने वस्तीतील लोकांनी पोलिसांना माहिती दिली. विद्यार्थिनीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्या जबाबानंतरच नेमका प्रकार काय झाला हे स्पष्ट होणार आहे.