मामेभावाने केला आतेभावाचा खून; पत्नीवर वाईट नजर ठेवतो म्हणून काढला काटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2022 15:29 IST2022-04-01T15:25:37+5:302022-04-01T15:29:36+5:30

दारूच्या नशेत आशिषने नीलेंद्रच्या पत्नीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यामुळे चिडलेल्या नीलेंद्रने आशिषचा दगडाने ठेचून खून केला.

Suspected of having a bad eye on wife, man killed his cousin | मामेभावाने केला आतेभावाचा खून; पत्नीवर वाईट नजर ठेवतो म्हणून काढला काटा

मामेभावाने केला आतेभावाचा खून; पत्नीवर वाईट नजर ठेवतो म्हणून काढला काटा

ठळक मुद्देचार दिवसांपासून हाेता बेपत्ता

हिंगणा/वाडी : आपल्या पत्नीवर वाईट नजर असल्याच्या संशयावरून मामेभावाने सख्ख्या आतेभावाचा दगडाने ठेचून खून केला. विशेष म्हणजे आतेभाऊ चार दिवसांपासून बेपत्ता हाेता. त्यातच हिंगणा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील डाेंगरगाव येथील जुन्या टाेल नाका परिसरात बुधवारी (दि. ३०) मृतदेह आढळून आल्याने त्याचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. पाेलिसांनी आराेपी मामेभावास अटक केली आहे.

आशिष जयलाल बिसेन (२६, रा. डाॅ.आंबेडकर नगर, वाडी, नागपूर) असे मृत आतेभावाचे तर नीलेंद्र कपूरचंद बघेल (२५, रा. खापरी, ता. हिंगणा) असे अटक करण्यात आलेल्या आराेपी मामेभावाचे नाव आहे. आशिष वाडी परिसरात मजुरी तर नीलेंद्र वर्धा राेडवरील धाब्यावर काम करायचा. आशिषने शनिवारी (दि. २६) सकाळी त्याच्या मुलीला चाॅकलेट विकत घेऊन दिले आणि घराबाहेर पडला. घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी ताे बेपत्ता असल्याची तक्रार वाडी पाेलीस ठाण्यात नाेंदविली हाेती.

दरम्यान, बुधवारी सायंकाळी डाेंगरगाव शिवारातील जुन्या टाेल नाक्याजवळ आशिषचा मृतदेह आढळून आला. त्याचा खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले हाेते. तपासादरम्यान, पाेलिसांनी त्याच्या मामेभावाला (नीलेंद्र) संशयाच्या बळावर ताब्यात घेत विचारपूस केली. त्याने खुनाची कबुली देत कारण सांगितल्याने हिंगणा पाेलिसांनी भादंवि ३०२ अन्वये गुन्हा नाेंदवून त्याला अटक केली.

पत्नीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य

नीलेंद्र शनिवारी वाडीला आला आणि त्याने आशिषला खापरी येथे नेले. दारू पिताना उशीर झाल्याने आशिष नीलेंद्रच्या घरी मुक्कामी हाेता. दाेघेही रविवारी (दि. २७) सायंकाळी डाेंगरगाव शिवारात गेले. तिथे दारूच्या नशेत आशिषने नीलेंद्रच्या पत्नीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यामुळे चिडलेल्या नीलेंद्रने आशिषचा दगडाने ठेचून खून केला. दुसरीकडे, वाडी पाेलिसांनी त्याचा शाेध सुरू केला हाेता.

Web Title: Suspected of having a bad eye on wife, man killed his cousin