विद्यार्थीच नव्हे संस्थाही कागदोपत्रीच?
By Admin | Updated: January 9, 2017 02:42 IST2017-01-09T02:42:24+5:302017-01-09T02:42:24+5:30
अनुदान तसेच शिष्यवृत्तीच्या नावाखाली शासनाकडून कोट्यवधींची रोकड उचलणाऱ्या महाभागांनी विद्यार्थ्यांचे प्रवेशच

विद्यार्थीच नव्हे संस्थाही कागदोपत्रीच?
सारेच धक्कादायक : चौकशीत चक्रावणारी माहिती
नरेश डोंगरे ल्ल नागपूर
अनुदान तसेच शिष्यवृत्तीच्या नावाखाली शासनाकडून कोट्यवधींची रोकड उचलणाऱ्या महाभागांनी विद्यार्थ्यांचे प्रवेशच नव्हे तर शिक्षण संस्थांही कागदावरच तयार केल्याचा संशय वाढवणारी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. लाखोंचे अनुदान अन् शिष्यवृत्ती महाघोटाळ्याचे नागपुरात गुन्हे दाखल झाल्यानंतर प्राथमिक चौकशीत उघड झालेल्या या माहितीने चौकशी करणारेही चक्रावले आहे.
विशेष म्हणजे, या खळबळजनक प्रकरणातील दोषी संस्थाचालकांना शासनाचे लाखोंचे अनुदान मिळवून देताना संबंधित विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नाक तोंडच नव्हे तर डोळेसुद्धा बंद करून जबाबदारी पार पाडल्याचे अधोरेखित झाले आहे. त्यामुळे कागदोपत्री संस्थानिक बनलेल्या आरोपींसोबत संबंधित विभागातील काही भ्रष्टाचाऱ्यांची भागीदारी आहे काय, अशी शंका निर्माण झाली आहे.
तेलंगखेडी, रामनगरातील रहिवाशी विशाल अरुण माटे या विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून कुसुमताई वानखेडे व्यावसायिक अभ्यासक्रम प्रशिक्षण केंद्राचा शिक्षक उमेश लाकडे तसेच स्वामी विवेकानंद संस्थेच्या मुख्याध्यापकासह संस्थेच्या संचालक आणि अन्य पदाधिकाऱ्यांविरुद्ध बजाजनगर पोलीस ठाण्यात ३ जानेवारीला फसवणुकीचा पहिला गुन्हा दाखल झाला. दुसऱ्या दिवशी अशाच प्रकारे रोशन दिलीप करवाळे (वय २१, रा. आंबेडकर कॉलनी) याची तक्रार आली. त्यावरून जरीपटका पोलिसांनी नॅशनल स्टडी आॅफ प्रोफेशनल इन्स्टिट्यूट(भीम चौक)च्या प्राचार्य आणि संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
घोटाळा जुना, प्रकरण नवीन !
दोन वर्षांपूर्वी राज्यातील विविध भागात अनेक संस्थाचालकांनी अशाच प्रकारे विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांचा वापर करून बनावट प्रवेश दाखवत शासनाला कोट्यवधींचा चुना लावला. अनुदान आणि शिष्यवृत्ती घोटाळयाचे धागेदोरे गडचिरोलीपासून बीड, सांगली, साताऱ्यापर्यंत विस्तारले असल्याचे उघड झाले. त्यामुळे या घोटाळ्याच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. के. व्यंकटेशम यांच्या मार्गदर्शनात एक विशेष चौकशी समिती (एसआयटी) नेमली. या समितीने राज्यातील कोणत्या संस्थांनी बनवाबनवी करून किती कोटी रुपये उकळले त्याचा अहवाल सरकारला दिला होता. हे प्रकरण शांत होण्याच्या स्थितीत असतानाच आता नवीन प्रकरणं उजेडात येऊ लागली आहेत. विशेष म्हणजे, या घोटाळ्याच्या चौकशी समितीचे प्रमुख डॉ. व्यंकटेशम सध्या नागपुरात पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या अधिकार क्षेत्रातच आता या घोटाळ्याची नवी प्रकरणं उघड होऊ लागल्याने आयुक्तांनी हा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे (ईओडब्ल्यू) पोलीस उपायुक्त ईशू सिंधू यांच्याकडे सोपविला आहे.