सार्वजनिक बांधकाम विभागात अजब कारभार, बदलीनंतरही जुन्या अभियंत्याकडूनच काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 19:14 IST2025-08-13T19:09:40+5:302025-08-13T19:14:06+5:30
Nagpur : महिला अभियंत्याची तक्रार, उपविभागीय अभियंता संजय उपाध्ये यांना कारणे दाखवा नोटीस

Strange management in the Public Works Department, work continues to be done by the old engineer even after transfer
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :सार्वजनिक बांधकाम विभागातील (पीडब्ल्यूडी) वाद काही थांबतच नाहीत, असे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. रविनगर येथील महिला शाखा अभियंत्यांनी आपल्या वरिष्ठ उपविभागीय अभियंत्याच्या वागणुकीविरोधात तक्रार दाखल केली असून, यात त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे, आपल्या पदस्थापनेनंतरही अद्याप जुन्या अभियंत्याकडूनच काम करवून घेतले जात असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे.
या तक्रारीनंतर कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत राऊळकर यांनी उपविभागीय अभियंता संजय उपाध्ये यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, तीन दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. महिला शाखा अभियंत्यांची बदली जून महिन्यात रविनगर येथील शाखेत झाली होती. मात्र, त्यांना अद्याप बदलीच्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली जात नाही, याउलट, त्यांच्या जागेवर पूर्वी कार्यरत असलेले अभियंतेच काम पाहत आहेत. इतकेच नव्हे तर, त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत, असा आरोप महिला अभियंत्याने तक्रारीत केला आहे.
तक्रारीची चौकशी सुरू, कारवाई अपेक्षित
या तक्रारीमुळे पीडब्ल्यूडीमधील अंतर्गत भोंगळ कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. महिला कर्मचाऱ्याला मिळणारी अशी वागणूक अत्यंत गंभीर मानली जात आहे. आता उपविभागीय अभियंते काय स्पष्टीकरण देतात आणि वरिष्ठ अधिकारी यावर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
८०० खोल्यांची जबाबदारी, तरीही अधिकार नाकारले
रविनगर परिसरात सुमारे ८०० सरकारी निवासस्थाने आहेत. येथील देखभाल-दुरुस्ती आणि इतर नागरी समस्यांवर लक्ष ठेवणे ही शाखा अभियंत्यांची जबाबदारी आहे. मात्र, महिला अभियंता जेव्हा संबंधित समस्यांबाबत वरिष्ठांकडे मांडणी करतात, तेव्हा त्यांना 'तुमचा याच्याशी काय संबंध' असे उत्तर मिळते. तसेच, मंजूर केलेली कामे फक्त जुने अभियंतेच पाहणार असल्याचे सांगण्यात येते, अशी तक्रार त्यांनी केली आहे.
कार्यालयाच्या गेटवरच लावले कुलूप
६ ऑगस्ट रोजी महिला अभियंता कार्यालयात पोहोचल्या असता, गेटला कुलूप लावलेले होते. काही वेळाने जुन्या अभियंत्यांनी येऊन गेट उघडले. उपविभागीय अभियंते कार्यालयीन वेळात अनुपस्थित राहतात आणि संध्याकाळी ६ वाजता बोलावतात. त्या वेळेस कार्यालयात इतर अनेक अनधिकृत व्यक्ती बसलेल्या असतात आणि वागणूकही उद्धट असते, अशी तक्रार महिला अभियंत्यांनी केली आहे.