वंदे भारत एक्स्प्रेसवर अल्पवयीन मुलांकडून दगडफेक; सहा जण ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 14:48 IST2023-01-30T14:47:18+5:302023-01-30T14:48:55+5:30
काच फुटली : कळमना - कामठी दरम्यान घडली घटना

वंदे भारत एक्स्प्रेसवर अल्पवयीन मुलांकडून दगडफेक; सहा जण ताब्यात
नागपूर : रेल्वे प्रशासनाकडून सुरक्षेच्या उपाययोजना होत असताना वंदे भारत ट्रेनवर दगडफेकीच्या घटना थांबायला तयार नाहीत. आज रविवारी पुन्हा नागपूर बिलासपूर या वंदे भारत ट्रेनवर कळमना-कामठीजवळ दगडफेकीची घटना घडली. यात ट्रेनची काच फुटल्याने रेल्वेचे नुकसान झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ ला नागपूर स्थानकावर वंदे भारत ट्रेनला हिरवी झेंडी दाखवली. तेव्हापासून ही हायस्पीड रेल्वेगाडी नागपूर ते बिलासपूर आणि बिलासपूर ते नागपूर रेल्वे मार्गावर प्रवाशांना सेवा देत आहे. नेहमीप्रमाणे आज दुपारी ही गाडी बिलासपूर मार्गावर धावत असताना नागपूरपासून पाच दहा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या कळमना - कामठी दरम्यान कोच क्रमांक सी - ६ तसेच कोच क्रमांक सी १०च्या खिडकीवर दगड येऊन पडल्याने प्रवासी हादरले.
उपनिरीक्षक सागर ठाकरे, रूपेश बनसोड आणि राहुल पांडे तसेच विवेक मेश्राम यांनी रेल्वेच्या वरिष्ठांना ही माहिती देऊन आरोपींची शोधाशोध सुरू केली. घटनास्थळ परिसरात विचारपूस केली असता रेल्वे लाइनच्या बाजूला खेळणाऱ्या सहा अल्पवयीन मुलांनी खेळता खेळता हे दगड गाडीकडे फेकल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले. रेल्वे सुरक्षा दलाच्या ईतवारी ठाण्यात अल्पवयीन बालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना सोमवारी बाल न्यायालयात दाखल केले जाणार आहे.