नरेश डोंगरे, नागपूर: गुजरातहून महाराष्ट्र, छत्तीसगड मार्गे पश्चिम बंगालपर्यंत धावणाऱ्या अहमदाबाद हावडा एक्स्प्रेसवर शनिवारी सायंकाळी दगडफेक झाली. नागपूर ते कामठी दरम्यान सायंकाळी ६:५५ वाजता ही घटना घडल्याने प्रवासी तसेच रेल्वे प्रशासनात काही वेळ खळबळ निर्माण झाली होती.
नियोजित वेळेपेक्षा १५ ते २० मिनिट विलंबाने धावत असलेली ही गाडी आज सायंकाळी नागपूर स्थानकावरून ६:३० च्या सुमारास निघाली. कामठी रेल्वे स्थानकाजवळ असताना सायंकाळी ६:५५ वाजता गाडीच्या कोच नंबर बी-२ च्या काचेवर दगड धडकला. हा दगड जोरात मारला गेल्यामुळे मोठा आवाज होऊन खिडकीची काच तडकून तिला छिद्र पडले. त्यामुळे प्रवासी घाबरले. त्यांनी रेल्वेच्या हेल्पलाइनवर माहिती देताच प्रशासनात एकच खळबळ उडाली. ट्रेनची एस्कॉर्ट टीम आणि रेल्वे सुरक्षा दलाचे जवान लगेच कोचमध्ये पोहचले. त्यांनी कोचची पाहणी करून प्रवाशांना विचारपूस केली. ती माहिती कंट्रोलला देऊन घटनास्थळाकडे आरपीएफचे पथक रवाना करण्यात आले.
मोठा अनर्थ टळलाघटनेच्या वेळी पाऊस सुरू असल्यामुळे प्रवाशांनी गाडीच्या डब्याच्या खिडक्या (काच) लावून घेतल्या होत्या. त्यामुळे दगड खिडकीच्या काचेवर आदळला. खिडकी उघडी असती तर दगड थेट आतमध्ये येऊन प्रवाशाला लागला असता.
चौकशी सुरूगाडीवर झालेल्या दगडफेकीच्या या घटनेबाबत रेल्वे सुरक्षा दलाचे विभागीय सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेची गंभीर दखल घेण्यात आल्याचे सांगितले. हा दगड कुणी समाजकंटकाने मारला की रुळावर असल्याचे तो ट्रेनच्या चाकाखाली येऊन उसळला, त्याचीही आम्ही चाैकशी करीत असल्याचे सांगितले.