चोरी केली, मुंबईला गेले, मौज केली, अखेर अडकले जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 17:40 IST2023-06-19T17:39:33+5:302023-06-19T17:40:57+5:30

दोन वयस्कांसह दोन अल्पवयीन आरोपींचा समावेश

Stealed, went to Mumbai, had fun, finally caught up with the police | चोरी केली, मुंबईला गेले, मौज केली, अखेर अडकले जाळ्यात

चोरी केली, मुंबईला गेले, मौज केली, अखेर अडकले जाळ्यात

नागपूर : जून महिन्याच्या ९ तारखेला पाचपावली पोलिस स्टेशनच्या हद्दीतील बुद्धनगर येथे चोरी केली. मुंबईत गेले, मज्जा केली, महागडे मोबाइल कपडे घेतले, अंगावर टॅटू गोंदले आणि नागपुरात येताच पाचपावली पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

आरोपींमध्ये अमर ऊर्फ प्रिन्स विनोद डोंगरे (१९) रा. आंबेडकर कॉलनी, रुद्रेश ऊर्फ रुद्र युवराज साखरे (१९) रा. नमो बुद्ध विहाराजवळ इंदोरा यांच्यासह दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांचाही समावेश आहे. यांनी बुद्धनगर येथील सुनील भीमराव ताकसांडे यांच्या घरी चोरी केली होती. ताकसांडे हे घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. आरोपींनी त्यांच्या घरात खिडकीचे दार उघडून प्रवेश केला होता व घरातील १ लाख रुपये रोख व सोन्या-चांदीचे दागिने, लॅपटॉप, एलसीडीसह २ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता.

या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले. त्यांना विचारपूस केल्यावर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्याचबरोबर आरोपींनी तीन चार महिन्यांपूर्वी एनएमसीच्या शाळेतून एक एलसीडी टीव्ही चोरला होता, पंचशीलनगर येथील एका घराचे कुलूप तोडून मंगळसूत्र व दागिन्यांची चोरी केली होती. रामटेकमधून एक दुचाकी व पाचपावली हद्दीत ३ घरांची घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून ५,६५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यातील विधिसंघर्षग्रस्त बालकांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. इतर दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Web Title: Stealed, went to Mumbai, had fun, finally caught up with the police