State Drama Competition: The final turn came at the door of Nagpur | राज्य नाट्य स्पर्धा : अंतिमची वारी आली नागपूरच्या दारी

राज्य नाट्य स्पर्धा : अंतिमची वारी आली नागपूरच्या दारी

ठळक मुद्देअंतिम फेरी होणार विभागवारसंस्कृत नाट्य स्पर्धा रविवारी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारे घेतल्या जाणाऱ्या हौशी राज्य नाट्य स्पर्धांच्या अंतिम फेरीची वारी नागपूरच्या दारी आल्या आहेत. यंदा संस्कृत आणि हिंदी नाट्य स्पर्धांची अंतिम फेरी नागपुरात रंगणार आहे.
हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धा व बाल नाट्य स्पर्धा या दोन स्तरातून खेळल्या जातात. विभागवार केंद्र निश्चित करवून प्राथमिक फेरीचे आयोजन केले जाते आणि त्यातून अव्वल नाटकांना अंतिम फेरित स्थान मिळत असते, तर हिंदी व संस्कृत नाटकांची प्राथमिक फेरी होत नाही. या स्पर्धा थेट खेळल्या जात असतात. त्याच अनुषंगाने दरवर्षी हिंदी व संस्कृत स्पर्धेच्या अंतिम फेरीचे स्थळ निश्चित केले जाते. मात्र, यंदा या दोन्ही स्पर्धांच्या आयोजनाला कलाटणी देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे दिसून येते. यावर्षीपासून या दोन्ही स्पर्धा विभागवार होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. संस्कृती ५९ वी महाराष्ट्र राज्य संस्कृत नाट्य स्पर्धा पुणे, मुंबई, नागपूर व नाशिक अशी विभागवार रंगणार आहे. त्या त्या विभागातील स्पर्धक नाट्य संघांना या चार केंद्रांवर विभागण्यात आले असून, परीक्षक या चारही केंद्रांवर जाऊन स्पर्धेचे परीक्षण करणार आहेत. संस्कृतची ही स्पर्धा २० ते २२ जानेवारीला पुणे केंद्रावर, २३ व २४ जानेवारीला मुंबई, २६ जानेवारीला नागपूर आणि २९ जानेवारीला नाशिक येथे पार पडेल, तर महाराष्ट्र राज्य हिंदी नाट्य स्पर्धेला ३ फेब्रुवारीपासून पुणे येथून सुरुवात होत आहे. पुण्यात ही स्पर्धा ३ ते १८ फेब्रुवारीदरम्यान रंगेल. त्यानंतर २० फेब्रुवारी ते ३ मार्चदरम्यान नागपुरात आणि ६ जे २६ मार्चदरम्यान मुंबई येथे ही स्पर्धा पार पडेल.

स्पर्धकांची दगदग वाचेल!
या दोन्ही स्पर्धेत सहभागी होणाऱ्या लांब पल्ल्याच्या स्पर्धकांना प्रवास, खर्च आणि इतर गोष्टींची तजवीज करताना फार दगदग होत असते. शासनाच्या या निर्णयामुळे स्पर्धकांना फार लांबचा प्रवास आणि होणारा मानसिक ताण वाचणार आहे. परीक्षकांना मात्र एका केंद्रावरून दुसऱ्या केंद्रांवर प्रवास करावा लागणार आहे. मात्र, शासनावर पडणारा आर्थिक ताण यामुळे कमी होण्याची शक्यता आहे. यंदा हिंदीमध्ये ७६ नाट्य संस्था सहभागी होत असल्याचे बघून, ही स्थिती समजता येईल.

दरवेळी बदलेल केंद्र
यंदा नागपूर विभागात या दोन्ही स्पर्धांची विभागवार फेरी नागपुरात सायंटिफिक सभागृहात रंगणार आहे. मात्र, पुढच्या वर्षीपासून चंद्रपूर, अमरावती आणि अकोला या केंद्रांवरही रोटेशन पद्धतीनुसार या दोन्ही स्पर्धांच्या विभागवार फेऱ्या रंगतील. संस्कृत स्पर्धेत बहुतांश संघ नागपुरातीलच असल्याने ही स्पर्धा कायम नागपुरातच पार पडण्याची शक्यता अधिक आहे.

Web Title: State Drama Competition: The final turn came at the door of Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.