‘लोडशेडिंग’ला सुरुवात : दसऱ्याच्या तोंडावर राज्यात वीजसंकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 20:53 IST2018-10-09T20:50:27+5:302018-10-09T20:53:17+5:30
ऐन दसऱ्याच्या तोंडावर राज्यात ‘लोडशेडिंग’ला सुरुवात झाली आहे. मागणी व पुरवठ्यामधील दरी वाढून आता अडीच हजार मेगावॅटहून अधिक वाढली आहे. यामुळेच राज्यात ‘लोडशेडिंग’ लागू करण्यात आले आहे, असा दावा महावितरणतर्फे करण्यात आला आहे. ही तात्पुरती व्यवस्था असून विजेचा पुरवठा वाढल्यानंतर राज्यात २४ तास वीजपुरवठा सुरू करण्यात येईल, असेदेखील स्पष्ट करण्यात आले आहे.

‘लोडशेडिंग’ला सुरुवात : दसऱ्याच्या तोंडावर राज्यात वीजसंकट
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऐन दसऱ्याच्या तोंडावर राज्यात ‘लोडशेडिंग’ला सुरुवात झाली आहे. मागणी व पुरवठ्यामधील दरी वाढून आता अडीच हजार मेगावॅटहून अधिक वाढली आहे. यामुळेच राज्यात ‘लोडशेडिंग’ लागू करण्यात आले आहे, असा दावा महावितरणतर्फे करण्यात आला आहे. ही तात्पुरती व्यवस्था असून विजेचा पुरवठा वाढल्यानंतर राज्यात २४ तास वीजपुरवठा सुरू करण्यात येईल, असेदेखील स्पष्ट करण्यात आले आहे.
अपुऱ्या पावसामुळे राज्यात कृषिपंपांकडून विजेची मागणी वाढली आहे. मुंबई वगळता उर्वरित राज्यात सद्यस्थितीत १९ हजार ५०० मेगावॅट विजेची आवश्यकता आहे; तर प्रत्यक्षात वीजपुरवठा हा १७ हजार मेगावॅटच्या आसपासच होत आहे. त्यामुळेच जास्त वीजहानी असलेल्या ठिकाणी कपात करावी लागत आहे. ‘जी-१’ (वीजहानी ५८ ते ६६ टक्के), ‘जी-२’ (वीजहानी ६६ ते ७४ टक्के) व ‘जी-१’ (वीजहानी ७४ टक्क्यांहून अधिक) येथे ‘लोडशेडिंग’ला सुरुवात करण्यात आली आहे.
मागील दोन ते तीन दिवसांत विजेच्या मागणीमध्ये एक हजार मेगावॅटची वाढ झाली आहे. अपुऱ्या पावसामुळे ही वाढ झाली आहे. शेतकऱ्यांना खरीपाच्या पिकांसाठी कृषिपंपांवर अवलंबून राहावे लागत आहे. दुसरीकडे विजेचे उत्पादनदेखील प्रभावित झाले आहे. ‘महाजेन्को’च्या ऊर्जा प्रकल्पांमध्ये आवश्यक प्रमाणात कोळशाचा पुरवठा होत नसल्याने उत्पादनाला फटका बसला आहे. परळी वीज केंद्रातील तीन, भुसावळ, कोराडी, खापरखेडा येथील प्रत्येकी दोन तर नाशिक व चंद्रपूर वीज केंद्रातील प्रत्येकी एक युनिट बंद आहे. कोयनेवरील वीज प्रकल्पाला पाण्याची उपलब्धता कायम राहावी, यासाठी सुस्त करण्यात आले आहे. ‘पॉवर एक्सचेंज’मध्ये विजेचे सरासरी दर १०.६५ रुपये प्रति युनिट इतके झाले आहेत. त्यामुळे वीज खरेदीमध्येदेखील अडचणी येत आहेत. राज्याला केंद्रीय ‘ग्रीड’ व खासगी वितरकांच्या भरवशावर राहावे लागत आहे.
स्रोत उपलब्धता (‘मेगावॅट’मध्ये)
सेंट्रल ग्रीड ४,७९०
महाजेन्को ५,३१५
गॅस प्रकल्प २६७
कोयना १,१५६
अदानी २,५५७
रतन २७०
जेएसडब्लू २८३
पवन ऊर्जा १७७
सौर ऊर्जा ५२८