वर्षभरापासून महिलेचा पाठलाग, अन संधी साधून भर रस्त्यावर विनयभंग
By योगेश पांडे | Updated: September 11, 2023 14:41 IST2023-09-11T14:38:33+5:302023-09-11T14:41:54+5:30
तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

वर्षभरापासून महिलेचा पाठलाग, अन संधी साधून भर रस्त्यावर विनयभंग
नागपूर : मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या एका महिलेचा वर्षभरापासून पाठलाग करणाऱ्या आरोपीने संधी साधून भर रस्त्यात विनयभंग केला. आश्चर्याची बाब म्हणजे महिलेच्या नातेवाईकांनी त्याला काही दिवसांअगोदर समजदेखील दिली होती. मात्र तरीदेखील त्याने असला प्रकार केला. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
विजय गुलाबराव गुरव (३०, टोपऱ्याचे विहीरीजवळ, तहसील) असे आरोपीचे नाव आहे. संबंधित ४८ महिला दररोज मॉर्निंग वॉकसाठी जाते. आरोपी विजय हा त्यांचा मागील वर्षभरापासून पाठलाग करत होता. तो मॉर्निंग वॉकच्या वेळी यायचा व त्यांचा पाठलाग करायचा. त्याने शेरेबाजी करण्यासदेखील सुरुवात केली होती. सोबत इतरही महिला असल्याने फिर्यादीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले व नंतर डोक्यावरून पाणी जात असल्याने तिने पुतण्याला याबाबत माहिती दिली. तिच्या नातेवाईकांनी विजयला गाठले व त्याला असे न करण्याबाबत समज दिली.
विजय काही दिवस शांत राहिला मात्र त्याने परत पाठलाग सुरू केला. सोमवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास त्याने महिलेचा पाठलाग केला व संधी साधत तिचा विनयभंग केला. यामुळे महिला चांगलीच हादरली. तिने तहसील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी विजयविरोधात गुन्हा नोंदवत त्याला अटक केली.