एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरुच, बस सेवा ठप्प; प्रवाशांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2021 11:33 IST2021-10-31T10:41:57+5:302021-10-31T11:33:17+5:30
ST bus employees : एसटीचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी कालपासून एसटी कर्मचारी आणि बीजेपीचे आंदोलन सुरू आहे. आज सकाळी ५ वाजेपासून पुन्हा एसटी कर्मचारी आणि बीजेपीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन सुरू केले.

एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरुच, बस सेवा ठप्प; प्रवाशांचे हाल
नागपूर : एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी महामंडळातील कर्मचारी संपात उतरले आहे. आज सकाळपासून शहरातील प्रमुख गणेशपेठ बस स्थानकावर आंदोलन सुरू असून बससेवा पूर्णत: ठप्प झाली आहे.
एसटीचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी कालपासून एसटी कर्मचारी आणि बीजेपीचे आंदोलन सुरू आहे. आज सकाळी ५ वाजेपासून पुन्हा एसटी कर्मचारी आणि बीजेपीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन सुरू केले. इंदूरला जाणारी गाडी अडवली आणि त्या गाडीची हवा सोडली. काही एसटीच्या कर्मचाऱ्यांनी दोन बसेस बाहेर काढल्या आणि इन आऊट गेटवर आडव्या लावल्या. यात काही जणांना गणेशपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले.
शहरातील गणेशपेठ येथील मुख्य बस स्थानकावर आज सकाळपासूनच आंदोलन सुरू असून एकाही बस सोडण्यात आलेली नाही. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत बसेस बाहेर जाऊ देणार नाही, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. दुसरीकडे या आंदोलनामुळे ऐन सणासुदीच्या काळात प्रवाशांचे हाल होणार असून एसटीलाही मोठा फटका बसणार आहे.
दरम्यान, एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी महामंडळातील अनेक कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या संपाचा परिणाम म्हणून महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य केल्या. त्यामुळे सर्व वाहतूक सुरळीत होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, अशी मागणी रेटून धरली आहे.