नागपुरात भरधाव ट्रक उलटून फेरीवाल्याचा दबून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 21:36 IST2019-05-27T21:35:30+5:302019-05-27T21:36:35+5:30
स्थानिक मंदिर टी पॉईंटकडून वीज केंद्राच्या दिशेने कोळसा घेऊन जाणारा अनियंत्रित ट्रक सर्व्हिस रोडच्या कठड्याला धडकला आणि उलटला. त्या ट्रकखाली दबल्याने फेरीवाल्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महादुला येथे सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली असून, या घटनेमुहे महादुला येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

नागपुरात भरधाव ट्रक उलटून फेरीवाल्याचा दबून मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (कोराडी) : स्थानिक मंदिर टी पॉईंटकडून वीज केंद्राच्या दिशेने कोळसा घेऊन जाणारा अनियंत्रित ट्रक सर्व्हिस रोडच्या कठड्याला धडकला आणि उलटला. त्या ट्रकखाली दबल्याने फेरीवाल्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महादुला येथे सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली असून, या घटनेमुहे महादुला येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सुनेरीलाल शिवसिंग सोनेकर (५२, रा. कन्हैया लेआऊट, महादुला, ता. कामठी) असे मृताचे नाव आहे. ते रोज महादुला येथील मुख्य बाजारात सर्व्हिस रोडच्या कडेला चप्पल-जोडे दुरुस्तीचे दुकान थाटून बसायचे. दरम्यान, सकाळी एमएच-४०/डीएस-६७४३ क्रमांकाचा ट्रक कोळसा घेऊन मंदिर टी पॉईंटकडून वीज केंद्राकडे जात होता. तो मुख्य बाजारात पोहोचताच चालकाचा ताबा सुटला आणि ट्रक सर्व्हिस रोडच्या कठड्यावर आदळला. त्यातच तो उलटला. तिथून पळणे शक्य न झाल्याने सुनेरीलाल ट्रकखाली दबल्या गेला आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.
अपघात होताच नागरिकांसह स्थानिक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी गर्दी केली होती. शिवाय, नागपूर - सावनेर महामार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली होती. काहींनी गर्दीचा फायदा घेत कोळसा चोरून न्यायला सुरुवात केली ता काही मोबाईलमध्ये फोटो काढण्यात व शुटिंग करण्यात मग्न होते. ओव्हरलोड व अनियंत्रित वाहतुकीमुळे हा अपघात झाल्याचा आरोप करीत नागरिकांनी सुनेरीलालच्या कुटुंबीयांना आर्थिक मिळण्याची तसेच अनियंत्रित ओव्हरलोड वाहतुकीला आळा घालण्याची मागणी रेटून धरली. त्यामुळे घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दुसरीकडे, कोराडी पोलीस व वीज केंद्र प्रशासनाने तात्काळ डोजर व हायड्रा बोलावून ट्रक बाजूला केला आणि सनेरीलाल यांचा मृतदेह बाजूला काढला. या प्रकरणी कोराडी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
दोन लाख रुपयांची मदत
सुनेरीलाल हे घरातील कर्ते पुरुष होते. ते रखरखत्या उन्हात चप्प्ल, जोडे दुुरस्ती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. त्यांना दोन मुले व मुलगी आहे. ते रोज सकाळी ७ वाजताच्या सुमारास सायकलने येथे यायचे आणि दुकान थाटायचे. नागरिकांनी मागणी विचारात घेता कोराडी वीज केंद्र प्रशासनाने मृत सुनेरीलाल यांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची सानुग्रह आर्थिक मदत घेण्याची घोषणा केल्यानंतर तणाव निवळला होता.