नागपुरात मायलेकावर भरधाव कार धडकली ; वृद्ध मातेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 20:57 IST2018-09-14T20:47:23+5:302018-09-14T20:57:26+5:30
रस्त्याने पायी जात असलेल्या मायलेकाला भरधाव कार चालकाने धडक मारली. त्यामुळे आईचा मृत्यू झाला तर मुलगा जखमी आहे. सक्करदरा चौकात गुरुवारी रात्री ११.१५ वाजता हा अपघात घडला. यामुळे काही वेळ परिसरात तणाव निर्माण झाला होता.

नागपुरात मायलेकावर भरधाव कार धडकली ; वृद्ध मातेचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रस्त्याने पायी जात असलेल्या मायलेकाला भरधाव कार चालकाने धडक मारली. त्यामुळे आईचा मृत्यू झाला तर मुलगा जखमी आहे. सक्करदरा चौकात गुरुवारी रात्री ११.१५ वाजता हा अपघात घडला. यामुळे काही वेळ परिसरात तणाव निर्माण झाला होता.
सुनंदा विजय करंदीकर (वय ६६) आणि त्यांचा मुलगा अंकुश (वय २५) हे सोमवारी पेठेतील रहिवासी होय. बाजाराच्या निमित्ताने ते सक्करदरा चौकात गुरुवारी रात्री आले होते. रात्री ११.१५ वाजता घरी जात असताना वेगात आलेल्या स्वीफ्ट कार (एमएच ३१/ ७६०२) च्या चालकाने त्यांना जोरदार धडक मारली. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या मायलेकांना बाजूच्या डॉक्टरकडे नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी सुनंदा करंदीकर यांना मृत घोषित केले. दरम्यान, या अपघातामुळे घटनास्थळी तणाव निर्माण झाला. माहिती कळताच सक्करदरा पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी जमावाला शांत केले. अंकूशच्या तक्रारीवरून आरोपी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील चौकशी सुरू आहे.
कारचालक नशेत ?
सुनंदा यांना वृद्धत्व आणि आजारामुळे अपंगत्व आले होते. त्या जास्त वेळ चालू शकत नव्हत्या. त्यामुळे त्या घुसतच चालायच्या. गुरुवारी कामाच्या निमित्ताने त्या घराबाहेर गेल्या होत्या आणि रस्त्याने घुसत घराकडे जात होत्या. आरोपी कारचालक मद्यधुंद अवस्थेत असल्यासारखा कार चालवित होता, असा संशय त्यावेळी तेथे हजर असलेल्यांनी पोलिसांसोबत बोलताना व्यक्त केला. शुक्रवारी रात्री ७ पर्यंत पोलिसांना आरोपी कारचालक सापडला नव्हता.
दुचाकी दुभाजकावर आदळली : तरुणाचा अपघाती मृत्यू
/>अनियंत्रित दुचाकी दुभाजकावर आदळल्याने खाली पडून गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रोहित तेजराम मेश्राम (वय १८) असे त्याचे नाव आहे. तो भांडेवाडी कळमन्यात राहात होता.
३१ जुलैच्या रात्री ७ वाजताच्या सुमारास मेश्राम त्याच्या दुचाकीने दिघोरी उड्डाणपुलावरून खाली उतरत होता. दुचाकीचा वेग जास्त असल्याने उतारावरून ती अनियंत्रित होऊन दुभाजकावर आदळली. त्याने डोक्यात हेल्मेट घातले नव्हते. त्यामुळे मेश्रामच्या डोक्याला जबर दुखापत झाली. त्याला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्याला गुरुवारी सायंकाळी ६.१५ च्या सुमारास डॉक्टरांनी मृत घोषित केले. मिळालेल्या माहितीवरून नंदनवन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.