नागपूर (भिवापूर) : भरगच्च प्रवासी घेऊन नागपूरकडे जाणारी भरधाव ट्रॅव्हल्स मानोरा फाटा परिसरातील नाल्यात पलटली. सुदैवाने यात जीवीत हानी झाली नाही. माञ ३२ वर प्रवासी जखमी झाले. यासर्वांना भिवापूर व उमरेड येथील शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले असुन येथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहे. सदर अपघात बुधवारला (दि.२४) सकाळी १० वाजताच्या सुमारास राष्ट्रीयमार्गावरील मानोरा फाटा परिसरात झाला.
प्राप्त माहितीनुसार एम.एच. ३७ बी. ६९६४ ही चामोर्शीवरून निघालेली श्रीबाबा नामक ट्रॅव्हल्स भिवापूर बसस्थानकावरून प्रवासी घेऊन नागपूरकडे निघाली. दरम्यान राष्ट्रीयमार्गावरील मानोरा फाटा शिवारात चालकाचे नियंञण सुटल्याने ही भरधाव ट्रॅव्हल्स थेट १५ फुट खोल नाल्यात कोसळली. सुदैवाने यात जीवीत हानी झाली नाही. दरम्यान याच मार्गाने उमरेडकडे जात असलेले माजी आ. सुधीर पारवे यांना अपघाताचे दृष्य दिसताच, त्यांनी लागलीच जखमींना मदतीचा हात देत, ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांना कळविले.
ट्रॅव्हल्स नाल्यात कोसळली असल्यामुळे प्रवाशांना बाहेर काढतांना पोलिसांना चांगलीच दमछाक करावी लागली. सर्व जखमींना शासकीय रूग्णवाहीका व खाजगी वाहनांनी भिवापूर व उमरेड येथील शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले. येथे माजी आ. सुधीर पारवे, राजू पारवे यांच्यासह परिविक्षाधीन उपविभागीय पोलिस अधिकारी वृष्टी जैन, ठाणेदार जयप्रकाश निर्मल, नायब तहसीलदार संजय राठोड आदी उपस्थित होते.
७ गंभीर जखमींना नागपूरला हलविले
३२ पैकी ७ प्रवाशी गंभीर जखमी असुन त्यांना नागपूर येथील मेडीकल इस्पितळात हलविण्यात आले आहे. वृत्त लिहेस्तोवर जखमींची नावे कळू शकली नाही. अपघातामुळे राष्ट्रीयमार्गाच्या दुतर्फा एक किमी पर्यंत वाहतुक प्रभावित झालेली होती.