पंढरपूरच्या आषाढी एकादशी यात्रेसाठी विदर्भातून विशेष रेल्वे गाड्या

By नरेश डोंगरे | Updated: July 4, 2024 21:24 IST2024-07-04T21:23:29+5:302024-07-04T21:24:02+5:30

केंद्रीय मंत्री गडकरी यांची रेल्वे मंत्रालयाकडे मागणी; तत्काळ प्रतिसाद : विदर्भातील भाविकांची सोय; नागपूर, अमरावती, खामगावमधून सुटणार गाड्या

special trains from vidarbha for ashadhi ekadashi yatra to pandharpur | पंढरपूरच्या आषाढी एकादशी यात्रेसाठी विदर्भातून विशेष रेल्वे गाड्या

पंढरपूरच्या आषाढी एकादशी यात्रेसाठी विदर्भातून विशेष रेल्वे गाड्या

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या मागणीला तत्काळ प्रतिसाद देत रेल्वे मंत्रालयाने पंढरपूर आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी विदर्भातून विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पंढरपूरला जाणाऱ्या विदर्भातील लाखो भाविकांची चांगली सोय होणार आहे. आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी पंढरपूरला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील भाविक जातात. त्यात विदर्भातील नागपूरसह भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा येथील भाविकांचाही मोठ्या प्रमाणात समावेश असतो.

यंदा बुधवार, १७ जुलैला आषाढी एकादशी आहे. त्यामुळे १२ जुलैनंतर पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढणार आहे. मात्र, पंढरपूरला जाणाऱ्या रेल्वे गाड्या मोजक्याच असल्यामुळे अनेकांना विठ्ठलाच्या दर्शनाला जाताना गैरसोय होण्याची शक्यता होती. त्यामुळे पंढरपूरसाठी विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी विदर्भातील भाविकांची केली होती. या पार्श्वभूमीवर, केंद्रीय मंत्री गडकरी यांनी रेल्वे मंत्रालयाला पत्र लिहून विदर्भातून पंढरपूरसाठी विशेष गाड्या सुरू करण्याची मागणी केली होती. त्याला प्रतिसाद देत रेल्वे मंत्रालयाने विशेष गाड्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. विदर्भातील विठ्ठल भक्तांसाठी तातडीने विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल केंद्रीय मंत्री गडकरी यांनी रेल्वे मंत्रालयाचे आभार मानले आहे.

१४ जुलैपासून धावणार गाड्या

नागपूर, अमरावती व खामगाव अशा तीन ठिकाणांहून या गाड्या सुटणार आहेत. नागपूर येथून १४ व १५ जुलै, अमरावती येथून १३ व १६ जुलै तर खामगाव येथून १४ व १७ जुलैला या विशेष रेल्वे गाड्या सुटणार आहेत. याशिवाय १८ व १९ जुलैला नागपूर - मिरज - नागपूर या दोन विशेष गाड्यादेखील धावणार आहेत.
 

Web Title: special trains from vidarbha for ashadhi ekadashi yatra to pandharpur