मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
By नरेश डोंगरे | Updated: September 1, 2025 21:53 IST2025-09-01T21:53:06+5:302025-09-01T21:53:58+5:30
Maratha reservation protest: मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या जवळपास सर्वच गाड्यांमध्ये बसण्यासाठी ठिकठिकाणच्या रेल्वे स्थानकांवर रविवारी दुपारपासून गर्दी वाढली आहे.

मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
- नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबईत सुरू असलेल्या मराठा आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेली मंडळी ठिकठिकाणच्या रेल्वे स्थानकांवर पोहचत आहे. परिणामी मुंबई रेल्वे मार्गावरच्या बहुतांश मोठ्या रेल्वे स्थानकांवरील गर्दीत दोन दिवसांपासून लक्षणिय वाढ झाली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणाही अलर्ट मोडवर आल्या आहेत.
रेल्वेच्या शिर्षस्थ सूत्रांनुसार, मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या जवळपास सर्वच गाड्यांमध्ये बसण्यासाठी ठिकठिकाणच्या रेल्वे स्थानकांवर रविवारी दुपारपासून गर्दी वाढली आहे. आधीच सणासुदीमुळे आरक्षणासाठी रेल्वेत चढाओढ सुरू असताना आता आणखी अतिरिक्त प्रवाशांची भर पडल्याने अनेक गाड्यांमधील कोच 'हाऊस फुल्ल' झाल्याचे चित्र आहे. अनेक प्रवासी अनारक्षित डब्यांमध्ये (जनरल कोच) स्थान मिळवण्यासाठी वेळेपूर्वीच रेल्वे स्थानकांवर पोहचत असल्याने फलाटांवरही गर्दीचा ताण जाणवू लागला आहे.
रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ), लोहमार्ग पोलिस (जीआरपी) आणि स्थानिक पोलीस यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी रेल्वे स्थानकाच्या आतबाहेर तसेच परिसरात सीसीटीव्ही मॉनिटरिंग वाढविण्यात आले आहे. मुंबई मार्गावर धावणाऱ्या गाड्यांच्या आतमध्येही नजर रोखण्यात आली असून, स्थानकांवर गस्तही वाढवण्यात आली आहे. काही स्थानकांवर अतिरिक्त सुरक्षा रक्षकांची तैनात करण्यात आली आहे. बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (बीडीडीएस) तसेच पथकातील श्वान २४ तास टेहळणी, तपासणीच्या कामात गुंतविण्यात आले आहे.
जीआरपीकडून आवश्यक ती सर्व खबरदारी : पोलिस अधीक्षक शिंदे
गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागपूरच्या मुख्य आणि अजनी रेल्वे स्थानकांवर वाढलेली गर्दी लक्षात घेता आठवडाभरापासूनच अतिरिक्त बंदोबस्त लावण्यात आला आहे. आता रविवारपासून आंदोलकांनीही गर्दी चालविल्याने बंदोबस्तात वाढ केली आहे. जीआरपी, आरपीएफच्या वरिष्ठांकडून दोन दिवसांपासून स्थानकांवर भेटी दिल्या जात आहेत. या संबंधाने रेल्वेचे पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्याशी चर्चा केली असता आम्ही सतर्क असल्याचे ते म्हणाले. सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व खबरदारी घेत असल्याचीही प्रतिक्रिया त्यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.