ट्रकच्या धडकेत जावई, सासरे ठार; पत्नी गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2023 19:09 IST2023-05-30T19:08:54+5:302023-05-30T19:09:25+5:30
Nagpur News हुडकेश्वर पोलीस ठाण्यांतर्गत हैदराबाद-जबलपूर महामार्गावर भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकी चालकाचा जावई आणि मागे बसलेल्या सासऱ्याचा मृत्यू झाला.

ट्रकच्या धडकेत जावई, सासरे ठार; पत्नी गंभीर जखमी
नागपूर : हुडकेश्वर पोलीस ठाण्यांतर्गत हैदराबाद-जबलपूर महामार्गावर भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकी चालकाचा जावई आणि मागे बसलेल्या सासऱ्याचा मृत्यू झाला. मृतांमध्ये परसोडी, लाखनी, भंडारा रहिवासी आकाश दुर्गाप्रसाद जांभुळकर (२६) व सासरे राजाराम नानाजी दुर्गे (५५ वर्षे, रा. सुपगाव, चंद्रपूर), यांचा समावेश आहे, तर आकाशची पत्नी निर्धरा जांभुळकर (२७) हिच्यावर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. हा अपघात सोमवार, २९ मे रोजी दुपारी अडीच वाजता झाला.
सोमवारी आकाश हा सासरे राजाराम व पत्नी निर्धरासह ट्रीपल सीट चंद्रपूरहून मौदाच्या दिशेने दुचाकीवरून येत होता. हुडकेश्वर पोलीस ठाण्यांतर्गत महामार्गावर गब्बा ढाब्यासमोर भंडारा दिशेकडून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने आकाशच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात आकाश, त्याची पत्नी निर्धरा आणि सासरा राजाराम हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी मेडिकलमध्ये आणले असता डॉक्टरांनी तपासाअंती आकाश व राजाराम दुर्गे यांना मृत घोषित केले. फिर्यादी पीएसआय बाळू राठोड यांच्या माहितीवरून पोलिसांनी आरोपी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.