बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 22:17 IST2025-08-06T22:15:00+5:302025-08-06T22:17:09+5:30
Nagpur Crime: राजाखान उर्फ राजा अमरावती उर्फ सलीम खान (२१, बुलंद गेट समोर , मोठा ताजबाग) असे आरोपीचे नाव आहे. तो काही काळापासून आझादनगर, टेका नवी वस्ती येथे राहतो आहे.

बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
-योगेश पांडे, नागपूर
शहरातील बार व वाईन शॉप्समध्ये चोरी करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या चौकशीतून अगदी सिनेस्टाईल कहाणीच समोर आली आहे. त्याच्या वडिलांचा अत्याधिक मद्यप्राशनाने मृत्यू झाला होता. बार व वाईन शॉप चालक स्वत:च्या फायद्यासाठी लोकांना दारु विकतात व त्यांच्या जीवाशी खेळतात या संतापातून त्याने चोरी करायला सुरुवात केली. शहरातील याच दुकानांना तो टार्गेट करायचा. पाचपावली पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
राजाखान उर्फ राजा अमरावती उर्फ सलीम खान (२१, बुलंद गेट समोर , मोठा ताजबाग) असे आरोपीचे नाव आहे. तो काही काळापासून आझादनगर, टेका नवी वस्ती येथे राहतो आहे. त्याच्या वडिलांचा काही वर्षांअगोदर मद्यप्राशनातूनच मृत्यू झाला होता. यामुळे त्याच्या मनात बारचालक व वाईन शॉप्सविरोधात संताप होता. त्यातूनच त्याने बदला घेण्यासाठी तेथेच चोरी करण्याचे ठरविले.
रात्रीच्या वेळी शटर तोडून गल्ल्यावर मारायचा डल्ला
त्याने शहरातील ८ दुकानांमध्ये चोरी केली. तो रात्री शटर तोडून त्याला थोडेसे वर करून कृश शरीरयष्टीचा फायदा घेत आत शिरायचा. त्यानंतर तेथील गल्ला लुटायचा. ३१ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास त्याने राणी दुर्गावती चौकातील मयुरी सावजी बार ॲन्ड रेस्टॉरेन्टमध्ये अशीच चोरी केली. त्याने तेथून रोख ३६ हजार व सिगारेटची पाकिटे असा ४० हजारांचा मुद्देमाल लंपास केला.
मालक निलेश देवानी यांच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसंनी राजाला ताब्यात घेतले. त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याने अंबाझरी, सदर, हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दारूच्या दुकानांतदेखील चोरी केल्याची माहिती दिली.
दारुचे व्यसन नाही, मात्र गांजाची नशा
आरोपीचे वडील मद्यप्राशनाने वारले होते. त्यामुळे राजा खान हा दारूचे व्यसन करत नाही. मात्र चोरलेल्या पैशांतून तो गांजाची नशा करत असल्याची बाब चौकशीतून समोर आली आहे. त्याची ही कहाणी ऐकून पोलिसांनीदेखील डोक्यावर हात मारून घेतला.