‘शॉर्ट कट’ पैशांचा मोह भोवला, ‘सॉफ्टवेअर इंजिनिअर’ची ऑनलाईन २० लाखांनी फसवणूक
By योगेश पांडे | Updated: April 24, 2023 17:19 IST2023-04-24T17:19:15+5:302023-04-24T17:19:34+5:30
‘मूव्ही रेटिंग’च्या ‘पार्ट टाईम जॉब’च्या नादात बसला फटका : ‘टेलिग्राम ॲप’च्या माध्यमातून सायबर गुन्हेगारांनी रचले जाळे

‘शॉर्ट कट’ पैशांचा मोह भोवला, ‘सॉफ्टवेअर इंजिनिअर’ची ऑनलाईन २० लाखांनी फसवणूक
नागपूर : बहुतांश वेळा कमी शिकलेले किंवा तंत्रज्ञानाची फारशी जाण नसलेले लोक सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात फसत असल्याचे दिसून येते. मात्र नागपुरात एक ‘सॉफ्टवेअर इंजिनिअर’चीच तब्बल २० लाखांहून अधिक रकमेने ऑनलाईन फसवणूक झाल्याची बाब समोर आली आहे. ‘पार्ट टाईम जॉब’च्या नादात संबंधित इंजिनिअरला फटका बसला. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
मुळचे कोल्हापूर येथील रहिवासी असलेले प्रशांत शहापुरे (२९, बेसा) असे फसवणूक झालेल्या इंजिनिअरचे नाव आहे. ते एका नामांकित कंपनीत वरिष्ठ इंजिनिअर पदावर कार्यरत आहेत. फेब्रुवारी महिन्यात त्यांना टेलिग्राम ॲपवर प्राजीना जानकी नामक एका महिलेचा मॅसेज आला. चित्रपटांचे घरबसल्या रेटिंग करण्याचा पार्ट टाईम जॉब असल्याचे तिने सांगितले. संबंधित काम करण्यास शहापुरे यांनी इच्छा दर्शविली. संबंधित महिलेने एका इंटरनेट प्लॅटफॉर्मवर शहापुरे यांना नोंदणी करायला सांगितली व रेटिंगचे टास्क दिले.
शहापुरे यांना पहिल्याच दिवशी हजार रुपये प्राप्त झाले. त्यानंतर त्यांना ‘सिनेस्तान ऑनलाईन अर्निंग’ या टेलिग्राम ग्रुपमध्ये जोडण्यात आले. यामुळे शहापुरे यांचा महिलेवर विश्वास बसला. पुढील कामाच्या टास्कसाठी तिने त्यांना ११ हजार रुपये जमा करण्यास सांगितले व येथूनच शहापुरे आरोपींच्या जाळ्यात फसत गेले. शहापुरेंच्या टास्कचे पैसे एका व्हर्चुअल खात्यात जमा होत होते व तेथून ते बॅंकेत वळते करू शकत होते. त्यानंतर त्यांचे व्हर्चुअल खात्यातील रक्कम ‘निगेटिव्ह’मध्ये गेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी ते पैसे भरले व त्यांच्या खात्यात नफ्यासह रक्कम दिसू लागली. त्यामुळे शहापुरे आणखी उत्साहात आले.
५ मार्च ते ३० मार्च या कालावधीत त्यांनी टप्प्याटप्प्याने २० लाख ५४ हजार रुपये भरले. मात्र त्यातील एकही पैसा मिळाला नाही. या रकमेच्या ४० टक्के रक्कम भरली तर पूर्ण रक्कम मिळेल असे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर घासाघीस करून ही रक्कम साडेसहा लाखांवर आली. मात्र त्याचवेळी टेलिग्राम ग्रुपचे नाव ‘इरोसनाऊ’ असे बदलण्यात आले. त्यांना समोरील व्यक्तींनी मुंबईतील कार्यालयाचा पत्तादेखील दिला. शहापुरे यांनी तेथे जाऊन माहिती काढली असता तो इरोस इंटरनॅशनलचा पत्ता होता व त्यांच्याकडून कुठलेही मूव्ही रेटिंग करण्यात येत नसल्याचे सांगण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे शहापुरे यांना लक्षात आले व त्यांनी बेलतरोडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी आयटी ॲक्टअंतर्गत प्राजना जानकी, विक्रम व संजना या आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.