लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळात गैरव्यवहार झाल्याची बाब समोर आल्याने खळबळ उडाली होती. यासंदर्भात 'सोशल बफेट'च्या संचालिकेवर गुन्हा दाखल झाला होता. मात्र, महिला व बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांनी मात्र ही कारवाई चुकीची असल्याचे म्हणत संबंधित संस्थेची तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.
महामंडळाचे केंद्र कोराडी येथील जगदंबा मंदिर परिसराजवळ नियोजनानुसार गारमेंट सेंटरमध्ये २०० महिलांना प्रशिक्षण दिले जाणार होते. शिवणकाम आणि भरतकामाचे प्रशिक्षण देण्याचे काम पुण्यातील सोशल बफेटची संचालिका निवेदिता नाहरला देण्यात आले होते.
त्यासाठी शासनाने २२७ मशीन उपलब्ध करून दिल्या होत्या. संबंधित साहित्य इचलकरंजी येथील वरद एंटरप्रायझेसकडून घेण्याचे निश्चित झाले होते. २९ फेब्रुवारी २०२९ ते २६ एप्रिल २०२४ या कालावधीत निवेदिताने वरद एन्टरप्रायझेसचा मालक उमेश रॉय जाधवशी संगनमत करून २२७ पैकी १७४ मशीनची अफरातफर केली. त्यांची किंमत ८७.८५ लाख इतकी होती. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता आरोपींनी अफरातफर केल्याची बाब समोर आली.
कुठलीही कुचराई खपवून घेणार नाही : महसूलमंत्रीदरम्यान, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हेदेखील या बैठकीत उपस्थित होते. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कोराडी येथे बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेला प्रकल्प चांगल्या पद्धतीने चालविण्यात यावा. यासाठी आवश्यकता वाटल्यास आणखी निधीची तरतूद करण्यात येईल. मात्र, आता यामध्ये कुचराई केलेली खपवून घेणार नाही, असा इशारा बावनकुळे यांनी दिला. केंद्रात चांगले काम सुरू असताना इचलकरंजी येथील वरद कंपनीने योग्यप्रकारे मशीनचा पुरवठा न केल्याने योग्यप्रकारे काम झालेले नाही. त्यामुळे वरद या कंपनीवर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून मशीनचा पुरवठा तात्काळ करून घेण्यात यावा, तसेच सर्वांत चांगले काम करण्याच्या उद्देशाने या प्रकल्पाचे काम करावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.