सहा नागपूरकर महिला बाईकर्स ठरल्या ‘क्वीन्स ऑन द व्हील’
By जितेंद्र ढवळे | Updated: March 7, 2024 19:16 IST2024-03-07T19:16:08+5:302024-03-07T19:16:19+5:30
हैदराबाद, भुवनेश्वर, मुंबई, पुणे, उज्जैन, इंदूर, ग्वाल्हेर, देवास येथील १९ महिलांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला.

सहा नागपूरकर महिला बाईकर्स ठरल्या ‘क्वीन्स ऑन द व्हील’
नागपूर: सीएसी-ऑलराऊंडर्स, नागपूरच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ऑल वुमन बाइकिंग टूरमध्ये नागपूरच्या सहा महिला बाईकर्स १४४० किलोमीटर अंतर पूर्ण करीत "क्वीन्स ऑन द व्हील" ठरल्या. २ मार्च रोजी सुरू झालेल्या या मोहिमेत या महिलांनी ‘हार्ट ऑफ इंडिया’ म्हणजेच मध्य प्रदेशात प्रवास करीत तेथील समृद्ध वारसा स्थळांना भेटी दिल्या. तेथील विविधरंगी संस्कृतीचा अभ्यास केला.
मध्य प्रदेश टुरिझमच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या ‘क्वीन्स ऑन द व्हील’ या ट्रेलमध्ये नागपुरातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या एमबीए कॉलेजच्या प्रा. शिल्पा पुरी, फोटोग्राफर ॲलेस्साँड्रा निर्वाण, पॅरॅमेडिकल टेक्निशियन रुचिका मेघे, आयआयएमची विद्यार्थिनी आग्या जैन, निसर्गोपचार तज्ज्ञ मैथिली सिंग व स्पोर्ट्स ट्रेनर कांचनी यादव या बाईकर्स सहभागी झाल्या होत्या. याशिवाय, हैदराबाद, भुवनेश्वर, मुंबई, पुणे, उज्जैन, इंदूर, ग्वाल्हेर, देवास येथील १९ महिलांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला.
या महिला बाईकर्सनी सांची, चंदेरी, कुनो, ग्वाल्हेर, ओरछा, खजुराहो आणि भोपाळ असा १४४० किलोमीटरचा प्रवास ८ दिवसांत पूर्ण केला. आज, ८ मार्च रोजी या मोहिमेचा भोपाळ येथे समारोप सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
महिला सक्षमीकरण आणि साहसी पर्यटनाला चालना देण्यासोबतच मध्य प्रदेशला महिला प्रवाशांसाठी सुरक्षित आणि सशक्त स्थान म्हणून प्रदर्शित करणे, हा या ट्रेलचा मुख्य उद्देश होता, अशी माहिती सीएसी-ऑलराऊंडर्स संचालक अमोल खंते यांनी दिली.