नागपुरात बनणार सहा नवीन पोलीस ठाणे; या भागात होणार नवीन ठाण्यांची निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 17:21 IST2025-03-05T17:20:29+5:302025-03-05T17:21:53+5:30

पोलिस अधीक्षकांनी तयार केला प्रस्ताव : आता ठाण्यांची एकूण संख्या २२ वरून होणार २८

Six new police stations to be built in Nagpur; New Thanas will be created in this area | नागपुरात बनणार सहा नवीन पोलीस ठाणे; या भागात होणार नवीन ठाण्यांची निर्मिती

Six new police stations to be built in Nagpur; New Thanas will be created in this area

अरुण महाजन 
लोकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा :
नागपूर जिल्ह्यात सध्या २२ पोलिस ठाणे आहेत. वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारी विचारात घेता सहा नवीन पोलिस ठाण्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी तयार केला असून, मंजुरीसाठी मुंबई डीजी कार्यालयामार्फत राज्याच्या गृहमंत्रालयाकडे पाठविला जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात पोलिस ठाण्यांची संख्या २८ होणार आहे.

जिल्ह्यातील नागपूर शहरालगतचे कामठी (जुनी), कामठी (नवीन), कोराडी, वाडी व हिंगणा हे पोलिस ठाणे आधीच पोलिस अधीक्षक कार्यालयातून तोडून नागपूर शहर पोलिस आयुक्त कार्यालयाला जोडली आहेत. आता खापरखेडा पोलिस ठाणे नागपूर शहर पोलिस आयुक्त कार्यालयाला जोडण्यासाठी राजकीय दबावाचा वापर केला जात आहे. या ठाण्याच्या हद्दीत २१ गावांचा समावेश असून, ही गावे नागपूर शहरालगत असल्याचा युक्तिवाद राजकीय नेत्यांकडून केला जात आहे. हे पोलिस ठाणे भौगोलिक व प्रशासकीयदृष्ट्या नागपूर शहर पोलिस आयुक्तालयाला जोडणे सोयीस्कर असल्याचे प्रस्तावात नमूद केले आहे.


या ठाण्यांची निर्मिती
नवीन पोलिस ठाण्यांमध्ये बाजारगाव (ता. नागपूर ग्रामीण), मोहपा (ता. कळमेश्वर), पाचगाव (ता. उमरेड), वडोदा (ता. कामठी), नांद (ता. भिवापूर) व कान्होलीबारा (ता. हिंगणा) यांचा समावेश आहे. यासाठी नऊ पोलिस ठाण्यांची विभागणी केली जाणार आहे.


गुन्हेगारीचे बदलते स्वरूप
नागपूर जिल्ह्यातील सध्याचे २२ पोलिस ठाणे काटोल, सावनेर, कन्हान, रामटेक, उमरेड व नागपूर (ग्रामीण) या सहा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयांमध्ये विभागली आहेत. वाढती लोकसंख्या, गुन्हेगारीचे बदलते स्वरूप, नागरिकांच्या सुविधा तसेच सध्याच्या पोलिस ठाण्यांमधील दैनंदिन प्रशासन लोकाभिमुख करणे, मनुष्यबळ विचारात घेता नवीन पोलिस ठाण्यांची निर्मिती करणे गरजेचे आहे. 


या ठाण्यांची विभागणी
बाजारगाव पोलिस ठाण्याला कोंढाळी ठाण्यातील ४१, कळमेश्वर व हिंगणा ठाण्यातील दोन गावे जोडली जाणार आहेत. मोहपा ठाण्याला कळमेश्वर ठाण्यातील १६, सावनेर ठाण्यातील १०, केळवद (ता. सावनेर) मधील पाच व काटोल ठाण्यातील तीन, पाचगाव ठाण्याला कुही ठाण्यातील ४२, वडोदा ठाण्याला मौदा ठाण्यातील ३४ गावे, नांद ठाण्याला भिवापूर ठाण्यातील १७ गावे, तर कान्होलीबारा पोलिस ठाण्याला हिंगणा ठाण्यातील ४३ गावे जोडली जाणार आहेत.
 

Web Title: Six new police stations to be built in Nagpur; New Thanas will be created in this area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.