एसआयआर पडताळणीत मुंबई, नागपूरसह १० जिल्हे रेड झोनमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 16:19 IST2026-03-31T16:18:35+5:302026-03-31T16:19:08+5:30
Nagpur : महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या मतदार याद्यांचे विशेष पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेचा निवडणूक आयोगाने २९ मार्चपर्यंतचा सविस्तर आढावा घेतला असून, ५० टक्क्यांपेक्षा कमी पडताळणी पूर्ण झालेल्या जिल्ह्यांना 'रेड झोन'मध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे.

SIR verification finds 10 districts including Mumbai, Nagpur in red zone
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या मतदार याद्यांचे विशेष पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेचा निवडणूक आयोगाने २९ मार्चपर्यंतचा सविस्तर आढावा घेतला असून, ५० टक्क्यांपेक्षा कमी पडताळणी पूर्ण झालेल्या जिल्ह्यांना 'रेड झोन'मध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. या यादीत राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर तसेच सांस्कृतिक राजधानी पुणेसह राज्यातील १० जिल्ह्यांचा समावेश आहे.
या मोहिमेत २००२ च्या मतदार यादीतील नावे आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील अंतिम मतदार यादीतील नोंदी यांची ताळमेळ तपासणी बीएलओ (बुथ लेव्हल ऑफिसर) स्तरावर केली जात आहे. मतदार यादीतील मृत, स्थलांतरित, डुप्लिकेट किंवा चुकीच्या नोंदी शोधून अद्ययावत आणि शुद्ध मतदार यादी तयार करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. देशभरात एसआयआर प्रक्रियेवर विशेष भर देण्यात आला आहे. निवडणूक आयोगाकडून झालेल्या आढाव्यात काही जिल्ह्यांमध्ये अपेक्षेपेक्षा कमी गतीने काम होत असल्याचे दिसून आले. याच पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यासह मुंबई उपनगर, मुंबई शहर, पुणे, ठाणे, पालघर, सोलापूर, रायगड, सांगली आणि नाशिक या जिल्ह्यांचा रेड झोनमध्ये समावेश आहे.
गडचिरोलीचा आदर्श ठरणारा नमुना
याउलट, दुर्गम आणि नक्षलग्रस्त भाग असूनही गडचिरोली जिल्ह्याने सर्वाधिक प्रभावी कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. बीएलओ, शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी आणि स्थानिक प्रशासनाच्या समन्वयातून घराघरात पोहोचून पडताळणीचे काम वेळेत पूर्ण करण्यात आले. ग्रामीण भागातील संघटित यंत्रणा आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटीमुळे गडचिरोलीचा नमुना राज्यासाठी आदर्श ठरत आहे. गडचिरोलीसोबतच हिंगोली, बुलडाणा, परभणी आणि नांदेड ही जिल्हे टॉप फाइव्ह ठरली आहेत.
'रेड झोन' जिल्ह्यांना विशेष सूचना
निवडणूक आयोगाने रेड झोन जिल्ह्यातील संबधित अधिकाऱ्यांना तातडीने गती वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. कमी प्रगती असलेल्या मतदारसंघांमध्ये कामाला गती देत अडचणींचे तत्काळ निराकरण करण्यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
रेड झोनमधील जिल्हे पडताळणीचे काम (टक्के)
मुंबई उपनगर २४.४१ टक्के
पुणे २५.७८ टक्के
ठाणे २७.२४ टक्के
नागपूर २८.८८ टक्के
पालघर ३५.३५ टक्के
मुंबई शहर ३६.२६ टक्के
सोलापूर ४२.११ टक्के
रायगड ४५.०७ टक्के
सांगली ४६.०३ टक्के
नाशिक ४७.३५ टक्के
टॉप फाइव्ह जिल्हे
गडचिरोली - ८२.१६ टक्के
हिंगोली - ८१.९२ टक्के
बुलडाणा - ७७.३२ टक्के
परभणी - ७३.५८ टकके
नांदेड - ७३.५७ टक्के