बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात एसआयआर लागू करण्याचा घाट ; नाना पटोले यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 14:41 IST2025-09-19T14:40:20+5:302025-09-19T14:41:01+5:30
Nagpur : गुरुवारी पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, बिहारमध्ये मेलेली माणसं जिवंत दाखवतात, जिवंत माणसं मेलेली दाखवतात. सर्वोच्च न्यायालयात हे सर्व समोर आले आहे.

SIR to be implemented in Maharashtra on the lines of Bihar; Nana Patole alleges
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्रातही बिहारच्या धर्तीवर एसआयआर लागू करण्याचा घाट निवडणूक आयोगाने घातला आहे. राज्य निवडणूक आयोगाने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे तसे तोंडी आदेश दिले आहेत. येत्या १५ दिवसांत २००० सालची यादी बीएलओ, तहसीलदार आणि एसडीओकडून मागवण्याचे काम सुरू केले आहे, असा आरोप काँग्रेस नेते आ. नाना पटोले यांनी केला. या सर्व मतदार याद्या ग्रामपंचायतस्तरावर आधी जाहीर कराव्या नंतरच मंजुरी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
गुरुवारी पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, बिहारमध्ये मेलेली माणसं जिवंत दाखवतात, जिवंत माणसं मेलेली दाखवतात. सर्वोच्च न्यायालयात हे सर्व समोर आले आहे. हा मोदीचा फंडा आहे. आपल्या विचाराची मतं ठेवून बाकी नावे काढून टाकायची हा भाजपचा फंडा आहे. मत चोरी सुरू आहे, यावर लोकांनी जागरूक व्हावे. निवडणुका पारदर्शक व्हाव्या, असेही पटोले म्हणाले. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करणारा कोणाचा नातेवाईक असेल. पुतळ्याची विटंबना केली, याचा निषेध करतो. हे राज्य सरकारचे अपयश आहे. ते विषयाला डायव्हर्ट करत आहेत.
भुजबळ यानी नौटंकी सोडावी
छगन भुजबळ हे मंत्रिमंडळात आहेत. भांडण लावून महाराष्ट्र विकला जात आहे. स्कॉलरशिप दिल्या जात नाही, जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा, काय निर्णय घ्यायचा हे भुजबळ यांनी ठरवावे. सामाजिक असमतोल बिघडवण्याचे काम सरकार करत आहे. यांचे दाखवायचे आणि खायचे दात वेगवेगळे आहेत. भुजबळ यांनी आता नौटंकी करणे सोडावे. निर्णय काय घ्यायचा तो घ्या; पण जनतेची दिशाभूल करू नका, अशी टीकाही पटोले यांनी केली.