आचारसंहितेच्या उल्लंघनप्रकरणी वाडीच्या मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 20:23 IST2019-09-26T20:21:43+5:302019-09-26T20:23:39+5:30
वाडी नगर परिषद क्षेत्रात राजकीय पक्षांचे बॅनर व होर्डिंग अजूनही काढण्यात आलेले नाही. यासंदर्भात हिंगणा विधानसभा मतदार संघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वाडी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

आचारसंहितेच्या उल्लंघनप्रकरणी वाडीच्या मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आचारसंहिता सुरू असतानाही वाडी नगर परिषद क्षेत्रात राजकीय पक्षांचे बॅनर व होर्डिंग अजूनही काढण्यात आलेले नाही. यासंदर्भात हिंगणा विधानसभा मतदार संघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वाडी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
गेल्या २१ सप्टेंबरपासून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून त्याची तातडीने अंमलबजावणी करणे आवश्यक असते. त्यानुसार ७२ तासाच्या आत राजकीय पक्षांचे पोस्टर, बॅनर, विकासकामांच्या उद्घाटनांचे फलक इत्यादी काढणे आवश्यक असते. त्यासंदर्भात निर्देशसुद्धा देण्यात आले आहेत. असे असतानाही २५ सप्टेंबरपर्यंत वाडी परिसरातील राजकीय पक्षांचे होर्डिंग व बॅनर काढण्यात आले नसल्याची बाब उघडकीस आली. सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेत वाडी नगर परिषदेचे मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. वाडी नगर परिषद क्षेत्रात सर्व राजकीय पक्षांचे होर्डिंग बॅनर हटविण्यात आले आहेत. एकही शिल्लक नाही, याचे प्रमाणपत्र तसेच आपल्याकडून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यासंदर्भात २४ तासांच्या आत खुलासा करावा, असे निर्देशही बजावले आहेत.