नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नारेबाजी करणारे गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 23:23 IST2018-10-19T23:22:44+5:302018-10-19T23:23:41+5:30
कॅन्वॉयसमोर काळे झेंडे घेऊन धावत येऊन मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करणाऱ्या भीम आर्मीच्या अध्यक्षांसह चार जणांना बजाजनगर पोलिसांनी अटक केली. गुरुवारी सायंकाळी ६.५० वाजता दीक्षाभूमीवरील मुख्य सोहळयापूर्वी ही घटना घडली. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेत काही वेळेसाठी खळबळ निर्माण झाली होती.

नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नारेबाजी करणारे गजाआड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कॅन्वॉयसमोर काळे झेंडे घेऊन धावत येऊन मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करणाऱ्या भीम आर्मीच्या अध्यक्षांसह चार जणांना बजाजनगर पोलिसांनी अटक केली. गुरुवारी सायंकाळी ६.५० वाजता दीक्षाभूमीवरील मुख्य सोहळयापूर्वी ही घटना घडली. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेत काही वेळेसाठी खळबळ निर्माण झाली होती.
प्रशांत मिलिंद बंसोड (वय २९, रा. जयभीम चौक, कळमना), अजय अंबादास भिमटे (रा. मोहपा, कळमना), अमोल मुन्नालाल चिमणकर आणि संघरत्न नरेंद्र पाटील (दोघेही रा. कामठी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
दीक्षाभूमीवरील मुख्य सोहळ्याला संबोधित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या वाहनांचा ताफा गुरुवारी सायंकाळी ६.५० वाजता वेस्ट हायकोर्ट मार्गाने जात होता. दीक्षाभूमी जवळच्या चौकाच्या पुढे (केदार यांच्या बंगल्याजवळ) अचानक उपरोक्त चारजण त्यांच्या साथीदारांसह काळे झेंडे घेऊन मुख्यमंत्र्यांच्या वाहनांसमोर धावत आले. त्यांनी भीम आर्मी जिंदाबाद म्हणत मुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे सुरक्षा यंत्रणेची धावपळ उडाली त्यांनी उपरोक्त चौघांना ताब्यात घेताच बाकी पळून गेले. या चौघांना बजाजनगर पोलिसांच्या हवाली करण्यात आले. बजाजनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून भीम आर्मी नागपूरचे अध्यक्ष बंसोड, नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष भिमटे तसेच कार्यकर्ते चिमणकर आणि पाटील या चौघांना अटक केली.