धक्कादायक, दुचाकीवर एसी सिलेंडर फुटल्याने मेकॅनिकचा मृत्यू
By योगेश पांडे | Updated: June 7, 2024 14:31 IST2024-06-07T14:30:45+5:302024-06-07T14:31:10+5:30
Nagpur : वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली घटना

mechanic dies after AC cylinder bursts on two-wheeler
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चालत्या दुचाकीवर एसी कुलींग सिलेंडर फुटल्यामुळे जखमी झालेल्या मेकॅनिकचा मृत्यू झाला. वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
योगेश ज्ञानेश्वर तांडेवार (२७, सोनबानगर, वाडी) असे मृतकाचे नाव आहे. तो त्रिमूर्ती नगर येथील डाईकिन कंडिशनर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत काम करत होता. तो एअर कंडिशनमध्ये एसी कुलिंग गॅस भरण्याचे काम करायचा. ५ जून रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास तो कंपनीतीलच सुधीर हाडगे सोबत दुचाकीने निघाला. त्याने एसी गॅस कुलिंग सिलेंडर दुचाकीवर पायाजवळ ठेवले होते. वडधामना संगम मार्गाजवळून जात असताना अचानक सिलेंडर फुटला व त्यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी शालिनीताई मेघे इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी योगेशला मृत घोषित केले. सुधीरवर उपचार सुरू आहेत. कुणाल मनगटे यांच्या सूचनेवरून वाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.