धक्कादायक, नागपुरातील मेयो इस्पितळात इंटर्न विद्यार्थिनीसमोर सफाई कर्मचाऱ्याचे अश्लील कृत्य
By योगेश पांडे | Updated: May 6, 2025 23:45 IST2025-05-06T23:43:41+5:302025-05-06T23:45:16+5:30
Nagpur Crime News: मेयो इस्पितळात एका इंटर्न तरुणीसमोर लिफ्टमध्ये सफाई कर्मचाऱ्याने स्वत:चे कपडे काढून अश्लील कृत्य केले. या घटनेमुळे मेयोत खळबळ उडाली आहे. या धक्कादायक प्रकरणामुळे इंटर्न्समध्ये संतापाचे वातावरण असून मेयो प्रशासनाविरोधात नाराजीचा सूर आहे.

धक्कादायक, नागपुरातील मेयो इस्पितळात इंटर्न विद्यार्थिनीसमोर सफाई कर्मचाऱ्याचे अश्लील कृत्य
- योगेश पांडे
नागपूर - मेयो इस्पितळात एका इंटर्न तरुणीसमोर लिफ्टमध्ये सफाई कर्मचाऱ्याने स्वत:चे कपडे काढून अश्लील कृत्य केले. या घटनेमुळे मेयोत खळबळ उडाली आहे. या धक्कादायक प्रकरणामुळे इंटर्न्समध्ये संतापाचे वातावरण असून मेयो प्रशासनाविरोधात नाराजीचा सूर आहे. मनोहर नत्थुलाल समुद्रे (वय ५२, आदर्शनगर, मानकापूर) असे आरोपीचे नाव आहे.
संबंधित तरुणीचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाले असून तिची मेयोत इंटर्नशिप सुरू आहे. सोमवारी साडेदहा वाजताच्या सुमारास ती मेयोत होती. तिला वॉर्ड क्रमांक ३६ मध्ये जायचे होते. त्यासाठी ती सर्जिकल कॉम्प्लेक्समधील ऑपरेशन थिएटरसमोरील लिफ्टने दुसऱ्या माळ्यावर जायला निघाली. लिफ्टमध्ये मनोहरदेखील होता व त्याला चौथ्या मजल्यावर जायचे होते. त्याच्याजवळ काही सामान होते. तरुणीने दुसऱ्या माळ्यावर जाण्यासाठी बटन दाबले. लिफ्ट वर जाऊ लागताच त्याने घाणेरडे चाळे सुरू केले. त्याने पॅन्ट व अंतर्वस्त्र काढले आणि अश्लील चाळे सुरू केले. यामुळे इंटर्न हादरली. तिने हा काय प्रकार आहे अशी विचारणा केली व तेवढ्यात दुसरा माळ्यावर लिफ्टचा दरवाजा उघडला. ती धावतच बाहेर पडली. ती हादरली असल्याने वॉर्डमध्ये न जाता पायऱ्यांनी खाली गेली व तिने इतर इंटर्न्सला आपबीती सांगितली. सर्वांनी आरोपीचा शोध सुरू केला. मात्र, तो दिसला नाही. काही वेळाने तो बाहेरच्या बाजूला दिसला. त्याला इंटर्न्सनी पकडले. तरुणीच्या तक्रारीवरून तहसील पोलिस ठाण्यात आरोपी मनोहरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीला सक्तीच्या रजेवर पाठविले
मेयो प्रशासनाने ही घटना गंभीरतेने घेतली आहे. ही घटना दुर्दैवी आहे. पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून संबंधित कर्मचाऱ्याला बिनपगारी सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. विशाखा समितीकडेही तक्रार करण्यात आली आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण यांनी दिली.