'विदर्भात शिवसेनेचे पुनरुज्जीवन करणार, उद्धव ठाकरेंच्या निष्क्रियतेमुळे खासदार-आमदार संपर्कात'; संजय निरुपम यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 14:45 IST2026-04-06T14:42:08+5:302026-04-06T14:45:00+5:30
Nagpur : शिवसेना (शिंदे गट) नेते संजय निरुपम यांनी आज नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.

'Shiv Sena will be revived in Vidarbha, MPs and MLAs are in touch due to Uddhav Thackeray's inaction'; Sanjay Nirupam claims
नागपूर: शिवसेना (शिंदे गट) नेते संजय निरुपम यांनी आज नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. विदर्भातील शिवसेनेची स्थिती, लोकसभा निवडणुकांचे संकेत आणि बोगस बाबांशी मुख्यमंत्र्यांच्या संबंधांवर होणारे आरोप यावर त्यांनी सडेतोड भाष्य केले.
विदर्भात शिवसेना पुन्हा कात टाकणार
विदर्भातील शिवसेनेच्या स्थितीवर बोलताना निरुपम म्हणाले, विदर्भात शिवसेनेची अनेक रोपटी उगवली होती, पण योग्य देखभालीअभावी ती सुकली. आता मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर जबाबदारी सोपवली आहे. जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आम्ही विदर्भात शिवसेना पुन्हा उभी करू.भाजपसोबतच्या युतीवर त्यांनी स्पष्ट केले की, भाजप मित्रपक्ष आहे, आव्हान नाही. भाजप आपल्या मित्रपक्षांना संपवते हा आरोप खोटा आहे, बिहारमधील नितीश कुमार यांचे उदाहरण समोर आहे," असेही त्यांनी नमूद केले.
'ऑपरेशन टायगर' आणि ठाकरेंची निष्क्रियता
उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना निरुपम म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी सत्तेसाठी नाही तर हिंदुत्वासाठी उठाव केला. "पक्ष फुटतो तेव्हा पक्षप्रमुख तो सावरण्याचा प्रयत्न करतो, पण उद्धव ठाकरेंनी तसे प्रयत्न केले का? निवडणुकांमध्ये शिंदे राज्यभर फिरत असताना ठाकरे कुठेच दिसले नाहीत. त्यांच्या याच निष्क्रियतेमुळे मुंबईतील दोन-तीन खासदार सोडले तर उरलेले सर्व खासदार आणि बहुतांश आमदार आमच्या संपर्कात आहेत," असा खळबळजनक दावा त्यांनी केला.
बोगस बाबा आणि अंजली दमानिया यांना इशारा
अशोक खरात प्रकरणी मुख्यमंत्र्यांवर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना निरुपम म्हणाले, "राजकारणी अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमात बाबांना भेटतात, पण त्यांच्या बंद खोलीतील कृत्यांचे समर्थन करत नाहीत. एकनाथ शिंदे यांना खरातचे कारनामे माहित असते तर त्यांनी त्याला कधीच तुरुंगात पाठवले असते." तसेच, अंजली दमानिया यांनी कोणाच्या तरी हातातले बाहुले बनून मोठ्या नेत्यांविरुद्ध वापरले जाऊ नये, असा सल्लाही त्यांनी दिला.