भाजप हिंदुत्वाच मार्केटिंग करतयं.. 'बंटी-बबली' त्या नौटंकीमधलं पात्र, संजय राऊतांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2022 13:27 IST2022-04-22T13:02:16+5:302022-04-22T13:27:17+5:30
बंटी-बबली मुंबईत पोहोचले असतील तर येऊ दे, त्यांना मुंबईच पाणी माहिती नाहिये अशी टीका संजय राऊत यांनी केली.

भाजप हिंदुत्वाच मार्केटिंग करतयं.. 'बंटी-बबली' त्या नौटंकीमधलं पात्र, संजय राऊतांची टीका
नागपूर : राणा दाम्पत्याने मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिला होता. त्यांनी याबाबतची तारीखही जाहीर केली होती. त्यानंतर आज ते मुंबईत दाखल झाले आहेत. तर, त्यांच्या आव्हानानंतर शिवसैनिकांचीही मातोश्रीबाहेर मोठी गर्दी जमली आहे. बंटी-बबलीला मुंबईच पाणी माहिती नसल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली.
संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. हनुमान चालिसा वाचन आणि रामनवमी साजरी करणं हे श्रद्धेचे व धार्मिक विषय आहेत, नौटंकी किंवा स्टंटबाजीचे विषय नाहीत.परंतु, भाजपने हिंदुत्वाची नौटंकी आणि स्टंटबाजी करून ठेवली असून त्यातीलच हे सर्व पात्र असल्याची सणसणीत टीका राऊत यांनी केली.
बंटी आणि बबली मुंबईत पोहोचले असतील तर येऊ दे, आम्हाला फरक पडत नाही. ही सर्व स्टंटबाजी आहे. हे सगळे फिल्मी लोकं आहेत. स्टंटबाजी व मार्केटिंग करणं त्यांच काम असून भाजपाला आता मार्केटिंगसाठी अशा लोकांची गरज पडत आहे. हिंदुत्वाचं मार्केटिंग करण्याची गरज नाही, आम्हाला हिंदुत्व म्हणजे काय हे आम्हाला माहित आहे, असं राऊत म्हणाले.