मुलाचा वाढदिवस साजरा करून तिने सोडला जीव; ऑफिसमध्ये वारंवार अपमान,नोकरी धोक्यात आणण्याचा कट बेतला जीवावर ?
By नरेश डोंगरे | Updated: October 27, 2025 20:37 IST2025-10-27T18:14:32+5:302025-10-27T20:37:52+5:30
Nagpur : असह्य छळामुळे उच्चाधिकारी महिलेचा करुण अंत ; न्यायासाठी पतीचा वेदनादायी संघर्ष

She died after celebrating her son's birthday; was she repeatedly insulting and threaten in the office?
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मृत्यूचा पाश आवळत असल्याची तिला जाणीव झाली असावी. म्हणून की काय वसुंधराने पतीसोबत आपल्या चिमुकल्यांना हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतले. तीन वर्षीय केदार आणि सहा वर्षीय कबीरचे मनसोक्त लाड केले. ‘पुढच्या वाढदिवसाला आपण नसू’ याची वसुंधराला जाणीव झाली होती. त्यामुळे तिने हॉस्पिटलमध्येच केक मागवला आणि मृत्यूच्या सावटाखाली लाडक्या कबीरचा वाढदिवस साजरा केला. यावेळी वसुंधराने आपले आक्रंदन दाबून घेतले. मुले बाहेर गेल्यानंतर ती हमसून हमसून रडली अन् पुढच्या सहा दिवसांनंतर वसुंधराने जीव सोडला. भरले कुटुंब कायमचे सोडण्यापूर्वी पतीला तिने साद घातली. मृत्यूला कारणीभूत असलेल्या शोभाला कायदेशीर धडा शिकवा, ही तिची शेवटची विनंती होती.
‘बॉस’च्या प्रचंड छळामुळे थेट मृत्यूच्या जबड्यात पोहोचलेल्या वसुंधरा गुल्हाणे-मिठेचा करुण अंत झाला. तेव्हापासून आपल्या दोन चिमुकल्यांना घेऊन तिचा पती पुष्पक न्यायासाठी संबंधित अधिकाऱ्यांचे उंबरठे झिजवत आहे. पाच महिने झाले, मात्र निगरगट्ट यंत्रणेकडून पुष्पक व त्याच्या दोन चिमुकल्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. दरम्यान, शुक्रवारी थेट पंतप्रधान, केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यक्रमातच महिला अधिकाऱ्याच्या बेदरकार वर्तनाने टपाल खात्याची लक्तरे वेशीवर टांगली गेली आणि याच खात्याच्या संबंधित अधिकाऱ्याच्या निर्दयी वृत्तीचा बळी ठरलेल्या उच्चाधिकारी महिलेच्या मृत्यू प्रकरणावर नव्याने उजेड पडला.
सुपर क्लास-वनपर्यंतचा विलक्षण प्रवास
नेरपरसोपंत गावची वसुंधरा लहानपणापासूनच अभ्यासात हुशार. नवोदय शाळेतील शिक्षणानंतर तिने महाविद्यालयीन शिक्षण यवतमाळला केले. त्यानंतर मुंबईच्या कॉलेजमधून बीएएमएस केले. जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर २०१२ एमपीएससी थ्रू डेप्युटी कलेक्टर बनली. लगेच २०१३ ला यूपीएससी क्रॅक करून आयपीओएस (इंडियन पोस्टल ऑफिसर्स सर्व्हिसेस) म्हणून सिलेक्शन झाले. होशंगाबाद, नागपूर, अमरावतीला सेवा दिल्यानंतर प्रमोशनवर नागपूरला १ जानेवारी २०२४ रोजी डीपीएस म्हणून रुजू झाली. येथे पोस्टमास्तर जनरल शोभा मथाळे होत्या. ऑफिसमध्ये वारंवार अपमान, टोचून बोलणे, चारित्र्यावर शिंतोडे उडवून नोकरी धोक्यात आणण्याची भीती वसुंधराला दाखवण्यात आली. १६ महिन्यांचा तो असह्य छळ वसुंधरा पतीला सांगत होती आणि तो धीर देत होता. मात्र, सततच्या मनस्तापामुळे ऑटो युमिनिटी डिसऑर्डर हा आजार झाला. तिला नागपूरच्या खासगी रुग्णालयात ७ मे २०२५ ला भरती करण्यात आले. मृत्यू जवळ असल्याची जाणीव झाल्याने वसुंधराने १० मे रोजी पतीसह दोन्ही चिमुकल्यांना बोलावून घेतले. त्यांचे मनसोक्त लाड केले. कबीरचा बर्थ डे केक बेडजवळ कापला अन् १६ मे रोजी तिने सर्वांचा कायमचा निरोप घेतला.
अस्वस्थ पती अन् निरागस चिमुकले
तेव्हापासून अस्वस्थ पुष्पक आपल्या दोन चिमुकल्यांना घेऊन पत्नीच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या मथाळेवर कारवाई करा, अशी मागणी घेऊन याचे-त्याचे उंबरठे झिजवत आहे. राष्ट्रपती, मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनाही त्याने निवेदने पाठवली आहेत. मृत्यूपूर्वी छळाची कथा लिहून ठेवलेला वसुंधराचा लॅपटॉप त्याने चाैकशी अधिकाऱ्यांना सोपविला आहे. मात्र, वसुंधराच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या ‘बॉस’वर अद्याप कारवाई झालेली नाही. निगरगट्ट यंत्रणा सैरभैर पुष्पक आणि नाहकच आई गमावलेल्या निरागस चिमुकल्यांवरही दया-माया दाखवायला तयार नाही.