Sharad Pawar visits East Vidarbha | शरद पवार पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर
शरद पवार पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : राज्यात सत्ता स्थापनेच्या झालेल्या हालचाली व त्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे १४ नोव्हेंबरला विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा हा दौरा राजकीय नसून परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी आहे.
विदर्भात सोयाबीन, कापूस, धान, संत्रा व मोसंबीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शरद पवार हे पूर्व विदर्भात हे पाहणी करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे माजी मंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्यांना भरीव मदत मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अगोदरपासूनच आग्रही भूमिकेत आहेत. यापूर्वीही शरद पवार यांनी मराठवाडा व महाराष्ट्राच्या इतर भागात बांधावर जाऊन शेतपिकाची पाहणी केली होती. पवार हे आता पूर्व विदर्भातील धान, कापूस, सोयाबीन, संत्रा व मोसंबीची पाहणी करणार आहेत.
१४ नोव्हेंबरला पीक पाहणीचा कार्यक्रम झाल्यानंतर १५ नोव्हेंबरला पवार हे नागपूर येथील कडबी चौकस्थित मेकोसाबाग शाळेच्या मैदानावर बिरसामुंडा जयंतीनिमित्त आदिवासी बचाव आंदोलनचे राष्ट्रीय संरक्षक सतीश पेंदाम यांच्या वतीने दुपारी २ वाजता आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. प्रशासनाच्यावतीने पंचनामे करण्याचे काम सध्या सुरू आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी कृषिमंत्री शरद पवार हेसुद्धा नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी पूर्व विदर्भात १४ नोव्हेंबरला येत आहेत.

Web Title: Sharad Pawar visits East Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.