नागपूर : राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या कार्यप्रणालीची पोलखोल करणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात अखेर राज्य शासनाकडून विशेष चौकशी पथक (एसआयटी) गठीत करण्यात आले आहे. पुण्याच्या विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांच्या समितीकडून २०१२ पासूनच्या प्रकरणांचा सखोल तपास करण्यात येणार आहे. त्यामुळे यातून आणखी बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. ‘लोकमत’ने हा घोटाळा तसेच ‘एसआयटी’चा मुद्दा लावून धरला होता हे विशेष.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
२०१२ पासून शिक्षक भरतीवर बंदी असूनही हजारो बोगस नियुक्त्या करण्यात आल्याचा गंभीर घोटाळा राज्यभर उघडकीस आला आहे. या पार्श्वभूमीवर बोगस शालार्थ आयडी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्यस्तरीय एसआयटी स्थापन करण्याची मागणी सातत्याने होत होती. नागपूर जिल्ह्यात २०१९ पासून ६८० बनावट शिक्षक नियुक्त्या व शालार्थ आयडी प्रकरणे समोर आली आहेत.
नागपुरात दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून २० हून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांना अटकही झाली आहे. याशिवाय नाशिक, जळगाव, बीड, लातूर, मुंबई या ठिकाणीदेखील गैरप्रकार आढळून आले. यासंदर्भात राज्य शासनाने ‘एसआयटी’ गठीत करावी अशी मागणी जोर धरत होती. अखेर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून ‘एसआयटी’ची घोषणा करण्यात आली.
पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) मनोजकुमार शर्मा व शिक्षण आयुक्तालयातील सहसंचालक (प्रशासन, अंदाज व नियोजन) हारून आतार यांचा या ‘एसआयटी’मध्ये समावेश आहे. या ‘एसआयटी’ला तीन महिन्यांच्या आत शासनाला अहवाल सादर करायचा आहे.
या बाबींवर ‘एसआयटी’ करेल तपास
राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाअंतर्गत अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ मान्यतांची तपासणी
शिक्षक व कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या विविध मान्यतांच्या संदर्भात प्रचलित व्यवस्थेमध्ये असलेल्या कमतरता शोधून त्या अनुषंगाने सुधारणा सुचविणे.
२०१२ पासून आजपर्यंतच्या प्रकरणांचा सखोल तपास करणार.
पोलिसांची राज्यस्तरीय ‘एसआयटी’देखील सक्रिय
या प्रकरणात अगोदर केवळ नागपूर पोलीस आयुक्तालयात ‘एसआयटी’ची स्थापना करण्यात आली होती. मात्र प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता पोलिस विभागाची राज्यपातळीवरील एसआयटी गठित करण्यात आली. नागपुरातील झोन-२ चे उपायुक्त व नागपुरातील घोटाळ्यातील एसआयटीचे प्रमुख नित्यानंद झा यांच्या नेतृत्वात ही राज्यपातळीवरील एसआयटी काम करत आहे.