शालार्थ आयडी घोटाळा: बोर्डाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी ‘एसआयटी’च्या जाळ्यात; शिक्षण विभागाला मोठा हादरा
By योगेश पांडे | Updated: May 22, 2025 22:15 IST2025-05-22T22:15:08+5:302025-05-22T22:15:44+5:30
Shalarth id Fraud: शालार्थ आयडी गैरवापर प्रकरणात विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती नेमली होती. त्यानंतर, ऑगस्ट २०२४ मध्ये शासनाने डॉ. माधुरी सावरकरांच्या नेतृत्वात सात सदस्यीय समिती नेमली.

शालार्थ आयडी घोटाळा: बोर्डाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी ‘एसआयटी’च्या जाळ्यात; शिक्षण विभागाला मोठा हादरा
योगेश पांडे,नागपूर
राज्याच्या शालेय शिक्षण विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठी घडामोड झाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुरुवारी राज्य शिक्षण मंडळाचे नागपूर विभागीय अध्यक्ष व तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांना ताब्यात घेण्यात आले. रात्रीपर्यंत त्यांचा जबाब नोंदवणे सुरू होते. या कारवाईमुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बुधवारी (२१ मे) प्रत्यक्ष शालार्थ आयडी बनविणारा उपसंचालक कार्यालयातील लिपिकाची अटक व त्यानंतर लगेच वंजारी यांच्यावरील कारवाई, यामुळे या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधारांपर्यंत एसआयटी लवकरच पोहोचेल, असे अंदाज वर्तविण्यात येत आहे.
नागपूर शिक्षण उपसंचालक कार्यालयात कार्यरत कनिष्ठ प्रशासन अधिकारी रवींद्र ज्ञानेश्वर पाटील यांनी १२ मार्च रोजी सायबर पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली होती.
वाचा >>'बाबा, माझी पत्नी आणि तिच्या प्रियकराला सोडू नका', निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची आत्महत्या
शालार्थ आयडी गैरवापर प्रकरणात विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती नेमली होती. त्यानंतर, ऑगस्ट २०२४ मध्ये शासनाने डॉ. माधुरी सावरकरांच्या नेतृत्वात सात सदस्यीय समिती नेमली, मात्र मध्येच या समितीकडून होत असलेली चौकशी थांबविण्यात आली होती. त्यांच्या जागी विभागीय अध्यक्ष झालेले चिंतामण वंजारी यांना या चौकशीचा अधिकार सोपविण्यात आला होता.
चिंतामण वंजारीचे नाव कसे आले समोर?
अगोदर नरडला अटक झाली व त्यानंतर एकापाठोपाठ एक लिंक समोर येत गेल्या. दोन दिवसांअगोदर पोलिसांनी प्रत्यक्ष बोगस शालार्थ आयडी बनविणाऱ्या लक्ष्मण उपासराव मंघाम (४७, वासंती अपार्टमेंट, आकांशी ले-आउट, दाभा) याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून वंजारी यांचे नाव समोर आले.
वंजारींनीच दिली होती परवानगी
वंजारी यांचे नाव अगोदरच्या आरोपींच्या चौकशीतदेखील समोर आले होते. २०१९ पासून हा गोरखधंदा सुरू असल्याचे आतापर्यंतच्या तपासात स्पष्ट झाले आहे. वंजारी शिक्षणाधिकारी असतानाच बनावट शालार्थ आयडींना मंजुरी देण्यात आली होती.
भरती प्रक्रिया बंद असतानादेखील ही मंजुरी देण्यात आली व या बाबी संगनमताने लपवून ठेवण्यात आल्या होत्या. सायबर पोलिस ठाण्याच्या पथकाने गुरुवारी वंजारी यांना ताब्यात घेतले. त्यांची सायंकाळी सखोल चौकशी झाली व त्यानंतर त्यांचे स्टेटमेंट घेतले जात होते.
आणखी एक अधिकारी रडारवर
दरम्यान, एसआयटीच्या रडारवर आणखी एक मोठ्या अधिकाऱ्याचे नाव आले आहे. या अधिकाऱ्यावर अगोदरपासूनच संशयाची सुई होती व लवकरच ताब्यात घेतले जाण्याची शक्यता आहे.