शहीद भूषणच्या वडिलांची आत्महत्या : काटाेल शहरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 22:45 IST2021-06-21T22:43:48+5:302021-06-21T22:45:53+5:30
Shaheed Bhushan's father commits suicide शहीद जवान भूषण सतई यांच्या वडिलांनी त्यांच्या घरातील स्नानगृहाच्या छताला गळफास लावून आत्महत्या केली.

शहीद भूषणच्या वडिलांची आत्महत्या : काटाेल शहरातील घटना
लाेकमत न्यूज नेटवर्क
काटाेल : शहीद जवान भूषण सतई यांच्या वडिलांनी त्यांच्या घरातील स्नानगृहाच्या छताला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना साेमवारी (दि. २१) पहाटे घडली असून, सकाळी उघडकीस आली. मुलगा गेल्यापासून ते अस्वस्थ असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली असून, याच अस्वस्थतेतून त्यांनी टाेकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
रमेश धोंडू सतई (६०, रा. फैलपुरा, काटोल) असे मृताचे नाव आहे. ते कुटुंबीयांना सकाळी ६ वाजताच्या सुमारास घरातील स्नानगृहात लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी कपड्याची दाेरी व दुपट्ट्याच्या मदतीने गळफास लावला हाेता. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून त्यांना खाली उतरविले आणि डाॅक्टरकडे नेले. डाॅक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घाेषित केले.
त्यांचा मुलगा भूषण (२८) हा भारतीय सैन्य दलात हाेता. पाकिस्तानने १३ नाेव्हेंबर २०२० राेजी काश्मीर खाेऱ्यात केलेल्या हल्ल्यात भूषण शहीद झाला. त्यानंतर रमेश सतत अस्वस्थ राहत असल्याने यांच्या वर्तनात काहीसा बदल झाला हाेता. ते फारसे कुणाशी बाेलतही नव्हते, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास जवाहर चव्हाण करीत आहेत.