लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार, नंतर टाळाटाळ; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2022 15:40 IST2022-05-02T15:20:15+5:302022-05-02T15:40:43+5:30
युवतीने लग्नासाठी हट्ट धरला असता आरोपी युवकाने हात वर केले.

लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार, नंतर टाळाटाळ; गुन्हा दाखल
नागपूर : लग्नाचे आमिष दाखवून जीवनभर सोबत राहण्याची बतावणी करून आरोपीने एका २० वर्षीय युवतीशी वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची घटना यशोधरानगर ठाण्यांतर्गत घडली आहे.
अंकुश अशोक शाहु (२७, नागपूर) याची ओळख एका २० वर्षीय युवतीशी झाली. दोघांची मैत्री झाली. बातचीत करताना त्यांची मैत्री प्रेमात बदलली. त्यांचे नियमित भेटणे सुरू झाले. त्यानंतर आरोपी युवकाने तिला लग्नाचे आमिष दाखवून जीवनभर सोबत राहण्याची बतावणी केली. युवतीनेही त्याच्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर युवकाने तिला शरीरसुखाची मागणी केली. युवक लग्न करणार असल्यामुळे तिनेही त्याच्यावर डोळे मिटून विश्वास ठेवला.
आरोपी युवकाने १६ जुलै २०२१ ते ३० एप्रिल २०२२ दरम्यान वेळोवेळी तिच्याशी जबरीने संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर युवतीने लग्नासाठी हट्ट धरला असता आरोपी युवकाने हात वर केले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच युवतीने यशोधरानगर पोलीस ठाणे गाठून आरोपी विरुद्ध तक्रार दिली. यशोधरानगर पोलिसांनी आरोपी युवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.