बंगले वाटपासाठी मंत्र्यांच्या ज्येष्ठतेचा निकष; एक डझन मंत्र्यांना नाग भवनात राहावे लागणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 15:15 IST2025-11-12T15:14:37+5:302025-11-12T15:15:08+5:30
Nagpur : राज्यात ३६ कॅबिनेट मंत्री आणि ६ राज्यमंत्री आहेत. रविभवनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'देवगिरी'सह एकूण सुमारे ३० बंगले आहेत.

Seniority criteria for ministers for allotment of bungalows; A dozen ministers will have to live in Nag Bhavan
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ८ डिसेंबरपासून नागपूरमध्ये सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी मंत्र्यांच्या निवास व्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. परंपरेनुसार कॅबिनेट मंत्र्यांना रविभवन तर राज्यमंत्र्यांना नाग भवनात निवास देण्यात येतो. मात्र यंदा कॅबिनेट मंत्र्यांची संख्या वाढल्याने जवळपास एक डझन कॅबिनेट मंत्र्यांना नाग भवनात राहावे लागण्याची वेळ आली आहे.
राज्यात ३६ कॅबिनेट मंत्री आणि ६ राज्यमंत्री आहेत. रविभवनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'देवगिरी'सह एकूण सुमारे ३० बंगले आहेत. यातील ६ बंगले विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, विधान परिषद सभापती, उपसभापती तसेच दोन्ही सदनांतील विरोधी पक्षनेते यांच्यासाठी राखीव आहेत. प्रत्यक्षात कॅबिनेट मंत्र्यांना राहण्यासाठी केवळ २३ बंगले उपलब्ध आहेत.
मुख्यमंत्री यांच्या निवासाची स्वतंत्र व्यवस्था रामगिरी येथे असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 'विजयगड' हे शासकीय निवासस्थान स्वतंत्र आहे. रविभवनात २४ जणांचीच सोय शक्य होते. त्यामुळे उर्वरित १२ कॅबिनेट मंत्र्यांना नाग भवनात राहावे लागणार आहे. कोणते मंत्री नाग भवनात शिफ्ट होतील, हे ठरवताना ज्येष्ठतेचा निकष लावला जाईल.
शपथविधीच्या क्रमावर न जाता, कोण किती काळ मंत्रिपदावर आहे, यावर वरिष्ठता ठरवली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार जुन्या, दीर्घकाळ मंत्रिपद सांभाळलेल्या नेत्यांना रविभवनात जागा आणि तुलनेने नव्या मंत्र्यांना नाग भवनात जागा दिली जाण्याची शक्यता आहे.
समितीकडून अंतिम निर्णय
कॅबिनेट मंत्र्यांच्या निवास व्यवस्थेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली निवास व्यवस्था समिती तयार करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी या समितीच्या सदस्य सचिव असून, पीडब्ल्यूडीचे वरिष्ठ अधिकारी सदस्य आहेत. समितीची एक बैठक पार पडली असून, लवकरच दुसऱ्या बैठकीत अंतिम निर्णय अपेक्षित आहे.
बावनकुळे कायम; जयस्वाल, भोयर शिफ्ट
रविभवनातील कॉटेज क्रमांक ५ मध्ये राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचे तर कॉटेज क्रमांक ६ मध्ये राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचे कार्यालय आहे. कॅबिनेट मंत्र्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी या दोन्ही मंत्र्यांना आता हिवाळी अधिवेशनात नाग भवनात हलवावे लागणार आहे. मात्र, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे रविभवनातील कॉटेज क्रमांक ११ मध्येच कायम राहणार असल्याची माहिती आहे. निवास व्यवस्थेतील ही फेररचना, हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्र्यांमध्ये नवे समीकरण निर्माण करणार, इतके मात्र निश्चित.