The self-proclaimed work of 'Lokmat Sakhi Samman' honour | नि:स्पृह कार्याला ‘लोकमत सखी सन्मान’चे कोंदण :कर्तृत्ववान स्त्रीशक्तीला सलाम !

डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात बुधवारी आयोजित लोकमत सखी सन्मान पुरस्कारांचे लोकमतच्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा तसेच महापौर नंदा जिचकार यांच्या उपस्थितीत थाटात वितरण करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक आशा पांडे यांचा यावेळी जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला तर रुबिना पटेल, वर्षा ढोके-सय्यद, डॉ. वर्षा नन्नावरे, कीर्ती आवळे, रुपाली मेश्राम आणि सरस्वती माजी सैनिक महिला बचत गटाला लोकमत सखी सन्मान पुरस्कारांनी गौरविण्यात आले. यावेळी ‘माधवबाग साने केअर’चे ‘सीएसआर’ प्रमुख मिलिंद सरदार, कुसुमताई बोदड प्रतिष्ठानच्या आरती बोदड, जगदंबा लोकसेवा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा ज्योती बावनकुळे, ‘ट्रीट आईस्क्रीम’च्या संचालिका मंजुषा चकनलवार, निवड समितीच्या सदस्य स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. रोहिणी पाटील, सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. स्मिता सिंगलकर, ज्येष्ठ पत्रकार सरिता कौशिक, ‘लोकमत’चे संपादक दिलीप तिखिले, लोकमत टाइम्सचे कार्यकारी संपादक एन.के. नायक, लोकमत समाचारचे संपादक विकास मिश्र, ‘लोकमत’चे निवासी संपादक गजानन जानभोर प्रामुख्याने उपस्थित होते.

ठळक मुद्देकला-साहित्य-संस्कृती, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, उद्योग, क्रीडा व शौर्य क्षेत्रातील रणरागिणींचा मान्यवरांच्या हस्ते गौरव

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जगात असे कोणतेच क्षेत्र नाही जिथे महिलांनी कर्तृत्वाचा ठसा उमटविला नसेल. स्वत:च्या कुटुंबाला आकार देण्यासह देशाच्या विकासात आणि समाजाच्या जडणघडणीत नेहमीच महिलांचे योगदान मोठे राहिले आहे. किंबहुना त्यांचे कर्तृत्व काकणभर सरसच ठरले आहे. विदर्भातही अशा अनेक महिला त्यांच्या ध्येयनिष्ठेतून समाजहितासाठी निस्वार्थपणे कार्य करीत आहेत. प्रसंगी अनेकांचा विरोध पत्करूनही न डगमगता त्यांचे कार्य अव्याहतपणे सुरू आहे. विदर्भाच्या कानाकोपऱ्यात कुठलीही प्रसिद्धी किंवा पुरस्काराची अपेक्षा न बाळगता नि:स्पृहपणे झोकून देऊन कार्य करीत आहेत. या गुणी महिलांचा शोध घेत त्यांचे हे कर्तृत्व इतरांना प्रेरणादायी ठरेल यासाठी विविध क्षेत्रात आपल्या कार्यकुशलतेने समाज घडविण्यात योगदान देणाऱ्या या महिलांना ‘लोकमत सखी सन्मान’ अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले.
डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह, सिव्हिल लाईन्स येथे बुधवारी रंगलेल्या या देखण्या सोहळ्यात लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा आणि महापौर नंदा जिचकार यांच्या प्रमुख उपस्थितीत जीवनगौरव पुरस्कारासह सात क्षेत्रातील महिलांचा गौरव करण्यात आला.
लोकमत सखी मंच आणि माधवबाग साने केअर प्रस्तुत, सहप्रायोजक कुसुमताई बोदड प्रतिष्ठान आणि ट्रिट आईस्क्रीम यांच्या सहकार्याने आयोजित विदर्भस्तरीय सन्मान समारोहात माधवबाग साने केअरचे सीएसआर प्रमुख मिलिंद सरदार, कुसुमताई बोदड प्रतिष्ठानच्या आरती बोदड, जगदंबा लोकसेवा प्रतिष्ठानच्या अध्यक्ष ज्योती बावनकुळे, ट्रिट आईस्क्रीमच्या संचालिका मंजूषा चकनलवार तसेच लोकमत सखी सन्मान निवड समितीच्या सदस्यांमध्ये प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ व स्नेहांचलच्या प्रमुख डॉ. रोहिणी पाटील, सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. स्मिता सिंगलकर, एबीपी माझाच्या विदर्भ ब्युरो चीफ सरिता कौशिक यांच्यासह लोकमतचे संपादक दिलीप तिखिले, लोकमत समाचारचे संपादक विकास मिश्र, लोकमत टाइम्सचे कार्यकारी संपादक एन.के. नायक व लोकमतचे निवासी संपादक गजानन जानभोर आणि लोकमतचे युनिट हेड नीलेश सिंह प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकमतच्या उपवृत्त संपादक सविता देव हरकरे यांनी केले. संचालन नेहा जोशी यांनी केले. या विविध पुरस्कारांसाठी विदर्भाच्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व नागपूर जिल्ह्यात कला-साहित्य-संस्कृती, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, उद्योग, क्रीडा, शौर्य या क्षेत्रात विशेष योगदान देणाºया रणरागिणींची निवड समितीने निवड केली आहे. या प्रतिभावंत सखींचा गुणगौरव करण्यात आला.
प्रत्येक क्षेत्रात महिलांचे कार्य प्रभावी : विजय दर्डा
लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यावेळी म्हणाले, स्त्रीशक्तीला विनम्रतापूर्वक नमन करणे हाच सखी सन्मान समारोहाचा मुख्य उद्देश आहे. त्यांनी यावेळी त्यांच्या पत्नी व लोकमत सखी मंचच्या संस्थापिका ज्योत्स्ना दर्डा यांच्या कार्याचे स्मरण केले. सखी मंचच्या माध्यमातून त्यांची भावना राज्यभर पसरली आहे. त्यामुळे तीन लाखांहून अधिक महिला मंचशी जुळल्या व सन्मानित झाल्या आहेत. भारताने अनंत काळापासून स्त्रीशक्तीची जोपासना केली आहे. पण त्यांना स्थान मिळत नव्हते. गेल्या १५-२० वर्षात समाजाची मानसिकता बदलत असून महिलांच्या कार्याचा सन्मान होतो आहे. खासदार म्हणून अंतराळापासून वैद्यकीय क्षेत्रापर्यंत व फायनान्सपासून अर्थमंत्री पदाच्या कारभारापर्यंत महिलांचे कार्य जवळून पाहिले आहे. प्रत्येक विभागात त्यांचे कार्य प्रभावित करणारे आहे. किंबहुना ज्या विभागात त्या आहेत त्या विभागातील कार्य अत्यंत सुरक्षित, चांगले व वेळेत पूर्ण होणारे असते. म्हणून त्यांना जेवढे सन्मानित करू तेवढे कमीच आहे. आमच्या आईबहिणी अधिक शिक्षित नव्हत्या पण जागृत होत्या. त्यामुळेच आम्ही घडलो, असे मनोगत व्यक्त करीत मुली शिक्षित झाल्या तर हा देश नक्कीच समृद्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मंचावर उपस्थित पाहुणे व सत्कारमूर्तींनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. त्या शक्तीला मी नमन करतो, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
नारीशक्तीचे महत्त्व अधोरेखित करणारा सन्मान : महापौर
लोकमत हे महाराष्ट्रातील क्रमांक एकचे वृत्तपत्र आहे व या वृत्तपत्राकडून मिळालेला सन्मान हा नारीशक्तीचे महत्त्व अधोरेखित करणारा असल्याची प्रशंसा महापौर नंदा जिचकार यांनी केली. महिला ही घराण्याचे नाव मोठे करू शकते. ती प्रसंगी सरस्वती, दुर्गा व लक्ष्मीचे रूप धारण करून कुटुंबाचे रक्षण करते. स्त्री ही घराचे कोंदण आहे. हिरे घडविण्याचे काम आईकडून होते, बालसंस्कार आईकडूनच मिळतात व आईच विश्व घडविते.

Web Title: The self-proclaimed work of 'Lokmat Sakhi Samman' honour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.