नागपूर ग्रामीण भागात ५० टन मोहफुल जप्त : हातभट्टीच्या दारूसाठी वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 23:07 IST2020-05-12T23:05:40+5:302020-05-12T23:07:44+5:30
उत्पादन शुल्क विभाग आणि ग्रामीण पोलिसांनी संयुक्तरीत्या कारवाई करून खुर्सापार नाक्यावर ५० टन मोहफुलाची वाहतूक करणारे दोन ट्रक जप्त केले. ट्रकमधील दोघांना अटक करण्यात आली आहे.

नागपूर ग्रामीण भागात ५० टन मोहफुल जप्त : हातभट्टीच्या दारूसाठी वापर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उत्पादन शुल्क विभाग आणि ग्रामीण पोलिसांनी संयुक्तरीत्या कारवाई करून खुर्सापार नाक्यावर ५० टन मोहफुलाची वाहतूक करणारे दोन ट्रक जप्त केले. ट्रकमधील दोघांना अटक करण्यात आली आहे.
हातभट्टीची दारू निर्माण करण्यासाठी मोहफुलांचा वापर करण्यात येतो. कोणतीही परवानगी न घेता छुप्या पद्धतीने दोन ट्रकमधून ५० टन मोहफुल बाहेर राज्यात नेले जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रमोद सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही विभागाच्या पथकांनी मंगळवारी सायंकाळी ६ च्या सुमारास खुर्सापार नाक्यावर या दोन ट्रकला थांबवून तपासणी केली. या दोन ट्रकमध्ये प्रत्येकी २५ टन मोहफुल आढळून आले. हे मोहफुल गुजरातहून आणण्यात आले असून ते महाराष्ट्रातून केळवद मार्गे छत्तीसगडकडे जात असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले. याप्रकरणी ट्रक ड्रायव्हर कमलेश सुग्रीव यादव तसेच सतीश गुरुदयाल यादव या दोघांना अटक करण्यात आली आहे. ते ग्राम भेडी वारंग वाडी जिल्हा बैतूल मध्य प्रदेश येथील रहिवासी असल्याचे समजते.
ही कारवाई केळवदचे ठाणेदार सुरेश मत्तामी, तसेच उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक रावसाहेब कोरे यांच्या नेतृत्वात द्वितीय, निरीक्षक बाळू भगत, अब्दुल रहीम सकुर, शिपाई राजेंद्र केवट, वाघजी बोंबले, अहमद बोधले यांनी केली.