शाळा सुरू, पण सुरक्षा धोक्यात! नागपुरात १६१ स्कूल व्हेईकल्सवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 18:03 IST2025-06-25T18:02:59+5:302025-06-25T18:03:25+5:30
दीडशेवर बस, व्हॅन्स, ऑटोंवर कारवाई : अनेक ठिकाणी अतिरिक्त विद्यार्थी बसवून वाहतूक

Schools open, but safety at risk! Action taken against 161 school vehicles in Nagpur
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शाळेचे नवीन सत्र सुरू झाल्यानंतर नागपुरातील रस्त्यांवर परत विद्यार्थ्यांनी भरलेल्या 'स्कूल बस' व 'व्हॅन्स' दिसू लागल्या आहे. अनेकांकडून मनमानी पद्धतीने कारभार करण्यात येत असून, नियमांचे पालन न करणाऱ्या दीडशेहून अधिक बस, व्हॅन्स व ऑटोचालकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. अनेक स्कूल बस व व्हॅन्समध्ये, तर अतिरिक्त विद्यार्थी बसवून बेदरकारपणे वाहतूक सुरू असल्याची बाब निदर्शनास आली.
२३ तारखेपासून नागपुरात अनेक शाळांना सुरुवात झाली, तर मंगळवारपासून बहुतांश शाळा सुरू झाल्या. स्कूल बस, व्हॅन्स किंवा ऑटोद्वारे अनेक विद्यार्थी शाळेत जातात. लहान मुले असल्याने चालकांनी प्रत्येक नियमाचे पालन करणे आवश्यक आहे.
मात्र, अनेक चालक नियमांचे पालनच करत नसल्याचे वारंवार दिसून येते. हीच बाब लक्षात घेऊन नागपूर पोलिसांच्या वाहतूक विभागाने मंगळवारी शहरात मोहीमच राबविली. यात अनेक वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसविल्याचे आढळून आले, तर बरेच चालक विना गणवेश वाहने चालवत होते. काही अतिआगाऊ चालकांकडून सिटबेल्ट न लावताच वाहन चालविण्यात येत होता, तर काही वाहनचालक, तर चक्क चौकांतील सिग्नल तोडून वाहने दामटून विद्यार्थ्यांचा जीवच धोक्यात घालताना दिसून आले. काही व्हॅनचालकांकडे फिटनेस प्रमाणपत्र तसेच इतर दस्तावेज नव्हते. पोलिसांनी दिवसभरात विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या १६१ वाहनचालकांवर कारवाई केली.
नियम पाळा, अन्यथा कारवाईला सामोरे जा
स्कूलबस व व्हॅन्स, तसेच ऑटोमध्ये लहान मुले दाटीवाटीने बसविण्यात येतात. सिग्नल न पाळता वाहने चालविणे म्हणजे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालण्याचाच प्रकार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. स्कूल बस, व्हॅन, तसेच ऑटोविरोधात पोलिसांची विशेष मोहीम सुरूच राहणार आहे. त्यामुळे कुणी नियम तोडला, तर त्याला कारवाईला सामोरे जावे लागेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
स्कूल बसवर सर्वाधिक कारवाई
दिवसभरात पोलिसांनी केलेल्या पाहणीत स्कूलबसकडूनच सर्वाधिक नियमभंग करण्यात येत असल्याचे दिसून आले. १०६ स्कूल बसवर कारवाई करण्यात आली, तर नियम तोडणाऱ्या २६ स्कूल व्हॅन्सदेखील आढळल्या. याशिवाय २९ ऑटोचालकांवरदेखील पोलिसांकडून कारवाई झाली.