स्कूल बसचे शुल्क वाढणार; पालकांच्या खिशाला बसणार कात्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2021 10:25 IST2021-11-26T15:33:20+5:302021-11-28T10:25:07+5:30
स्कूलबस चालकांनी शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. इंधन आणि इतर सर्व बाबी लक्षात घेता आमच्याकडे पर्यायच नसल्याचे स्कूल बस चालकांचे म्हणणे आहे.

स्कूल बसचे शुल्क वाढणार; पालकांच्या खिशाला बसणार कात्री
नागपूर : १ डिसेंबरपासून राज्यात वर्ग १ ते ४ च्या शाळा प्रत्यक्ष सुरू होणार आहे. आता सर्वच वर्ग प्रत्यक्षपणे सुरू होणार असल्याने ऑनलाईन शिक्षण एकप्रकार बंदच होणार आहे. पूर्ववत शाळा सुरू होणार असल्याने स्कूलबस शिवाय पर्याय नसलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना स्कुल बस शुल्क वाढीचा फटका बसणार आहे. कारण स्कूलबस चालकांनी शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. इंधन आणि इतर सर्व बाबी लक्षात घेता आमच्याकडे पर्यायच नसल्याचे स्कूल बस चालकांचे म्हणणे आहे.
मार्च २०२० मध्ये कोरोना लागला आणि तेव्हापासून स्कूल बस मालकाच्या घरापुढेच उभ्या राहिल्या. स्कूल बसला केवळ शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करण्याची परवानगी असल्याने इतर प्रवासी वाहतूकीसाठी उपयोगात आल्या नाही. काही स्कूल बस मालकांनी त्याचा प्रवासी वाहतूकीसाठी उपयोग करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीसांनी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केल्याने भितीपोटी स्कूलबस मालकांनी आपल्या बसेस घरापुढेच उभ्या ठेवल्या.
गेल्या दोन वर्षा पासून सरकारच्या आदेशानुसार शालेय विद्यार्थी वाहतूक व्यवसाय पूर्णपणे थांबला आहे. दोन वर्षात उभ्या असलेल्या बसेस भंगार अवस्थेत गेल्या आहेत. आज ती गाडी रस्तावर काढायची म्हणजे बॅटरी, टायर, विमा, पासिंग या सर्वांवर लागणारा खर्च किमान ८० हजार रुपये ते १ लाख पर्यंतचा आहे. दोन वर्षा आधी डिझेलचा दर ६७ रुपये इतका होता आणि आजचा दर ९३ रुपये लिटर प्रमाणे आहे. इंधनाची ही दरवाढ सुद्धा व्यावसायिकासाठी चिंतेची बाब आहे. शाळा सुरू झाल्याच्या बातमीने फायनान्स कंपन्या सुद्धा भारावून गेल्या आहेत. कर्ज हप्ता मागण्यांसाठी गाडीमालकाला तगादा लावत आहेत.
- स्कूलबस मालकांवर आलेली परिस्थती लक्षात घेता. इंधनाची दरवाढ आणि इतरही कारणे लक्षात घेता आम्ही २५ ते ३० टक्के दरवाढ करणार आहोत. शालेय विद्यार्थी वाहतूक व्यवसाय बचाव संघर्ष समितीतर्फे सर्व पालकांना विनंती आहे. तसेच सरकारने सुद्धा आमच्या व्यावसायिकांना वरील खर्च भागविण्यासाठी मदत करावी. गाडी मालक ह्या सर्व अडचणीत आसरा आणि मदत सरकारकडून मिळेल या अपेक्षेत आहे.
चंद्रकांत जंगले, अध्यक्ष, शालेय विद्यार्थी वाहूतक व्यवसाय बचाव संघर्ष समिती