सत्तुर व विनानंबरच्या दुचाकीसह मंथन, अचल पोहोचले तुरुंगात
By दयानंद पाईकराव | Updated: April 6, 2024 20:01 IST2024-04-06T19:54:05+5:302024-04-06T20:01:54+5:30
नागपूर : सत्तुर आणि विनानंबरची दुचाकी घेऊन फिरणाऱ्या दोन आरोपींना कपिलनगर पोलिसांनी गजाआड केले आहे. मंथन राजेंद्र ठाकरे (२३, ...

सत्तुर व विनानंबरच्या दुचाकीसह मंथन, अचल पोहोचले तुरुंगात
नागपूर: सत्तुर आणि विनानंबरची दुचाकी घेऊन फिरणाऱ्या दोन आरोपींना कपिलनगर पोलिसांनी गजाआड केले आहे. मंथन राजेंद्र ठाकरे (२३, रा. रंगु बाजीरावनगर, नाका नं. २) आणि अचल संतकुमार सराखे (२०, रा. सदवा माता मंदिरामागे, सावनेर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
कपिलनगर पोलिसांचे पथक गुन्हेगारांच्या शोधात शुक्रवारी ५ एप्रिलला रात्री ११.१० वाजता गस्त घालत होते. तेवढ्यात त्यांना म्हाडा चौक ते टायर चौकाकडे जाणाºया रस्त्यावर मर्क्युरी व्हिलाच्या गेटसमोर दोन आरोपी शस्त्र घेऊन असल्याची माहिती गुप्त बातमीदाराने दिली. पोलिसांचे पथक तेथे पोहोचले असता आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करीत होते. पोलिसांना त्यांना ताब्यात घेऊन मंथनच्या अॅक्टीव्हाची झडती घेतली असता पायदानावर दुपट्ट्यात २०० रुपये किमतीचा एक लोखंडी सत्तुर आढळला.
पोलिसांनी २५ हजार रुपये किमतीची अॅक्टीव्हा व सत्तुर असा २५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच अचलच्या ताब्यातून ५० हजार रुपये किमतीची विना नंबर प्लेटची दुचाकी जप्त केली. दोन्ही आरोपींना दुचाकीचे कागदपत्र विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. सहपोलिस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे आरोपींविरुद्ध कलम ४/२५, सहकलम १३५ नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.