संतनगरी शेगावचेही घेणार वंदे भारत दर्शन, आधी नव्हता थांबा, केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मागणीला यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 19:56 IST2025-08-08T19:55:44+5:302025-08-08T19:56:56+5:30
प्रवाशांना वाकुल्या दाखवत वायुवेगाने निघून न जाता आता नागपूर (अजनी)- पुणे वंदे भारत एक्स्प्रेस संत भूमी शेगाव येथे देखिल थांबणार आहे.

संतनगरी शेगावचेही घेणार वंदे भारत दर्शन, आधी नव्हता थांबा, केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मागणीला यश
नागपूर : प्रवाशांना वाकुल्या दाखवत वायुवेगाने निघून न जाता आता नागपूर (अजनी)- पुणे वंदे भारत एक्स्प्रेस संत भूमी शेगाव येथे देखिल थांबणार आहे. या ठिकाणी बसचा थांबा देण्यात आल्याचे रेल्वेच्या शिर्षस्थ अधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्री स्पष्ट केले आहे.
श्री माता वैष्णोदेवी कटरा-अमृतसर, बेळगाव-बंगळुरू आणि अजनी-पुणे वंदे भारत ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी, १० ऑगस्टला सकाळी नऊ वाजता हिरवा झेंडा दाखविणार आहेत. अजनी-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस नागपूर-पुण्यादरम्यान येणाऱ्या वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड आणि दौंड, अहिल्यानगर, कोपरगाव, आदी स्थानकांवर थांबणार असल्याचे प्रारंभी जाहिर करण्यात आले होते. मात्र, कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या विदर्भाच्या पंढरीत अर्थात श्री संत गजानन महाराज नगरी शेगावमध्ये देखिल या गाडीचा थांबा द्यावा, यासाठी केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधव यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्र पाठवून केली होती.
शेगावमध्ये रोज हजारो भाविक येतात. ही गाडी शेगावला जाता-येताना थांबल्यास त्याचा भाविकांना मोठा फायदा होईल. रेल्वेलाही त्यातून मोठे उत्पन्न मिळणार, हे लक्षात आणून दिल्यानंतर गुुरुवारी रात्री रेल्वेचे कोचिंग डायरेक्टर संजय आर. निलम यांच्या स्वाक्षरीचे एक पत्र प्रसार माध्यमात व्हायरल झाले. त्यानुसार, वंदे भारत एक्सप्रेसला शेगाव स्थानकावरही थांबा देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, यवतमाळशी कनेक्ट होता यावे म्हणून या गाडीला धामणगाव आणि चांदूर स्थानकावरही थांबे देण्यात यावे, अशी मागणी त्या भागातील नागरिकांकडून केली जात आहे.
रेल्वे स्थानकावर मोठा बंदोबस्त
वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ कार्यक्रम मुख्य रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ८ वर होणार आहे. त्यासाठी मुख्य अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत. ते लक्षात घेता रेल्वे स्थानकाच्या आतबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (बीडीडीएस), डॉग स्कॉड नियुक्त करण्यात आले आहे. रेल्वे पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे गेल्या दोन दिवसांपासून स्थानकावर भेट देऊन बंदोबस्ताचा आढावा घेत आहेत.