नागपुरात चक्क दारूच्या बॉटलमध्ये सॅनिटायझर विक्री! २५ लाखांचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 22:06 IST2020-04-17T22:05:48+5:302020-04-17T22:06:50+5:30
देशी दारूच्या बॉटलमध्ये सॅनिटायझर भरून बाजारात विक्री करणाऱ्या प्रमोद जयस्वाल यांच्या वर्धमाननगर येथील रॉयल ड्रींक्स या मद्य कारखान्यातून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी २५ लाख रुपयांचा सॅनिटायझरचा साठा जप्त केला.

नागपुरात चक्क दारूच्या बॉटलमध्ये सॅनिटायझर विक्री! २५ लाखांचा साठा जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशी दारूच्या बॉटलमध्ये सॅनिटायझर भरून बाजारात विक्री करणाऱ्या प्रमोद जयस्वाल यांच्या वर्धमाननगर येथील रॉयल ड्रींक्स या मद्य कारखान्यातून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी २५ लाख रुपयांचा सॅनिटायझरचा साठा जप्त केला. काही दिवसापासून रॉयल ड्रींक्सतर्फे चक्क दारूच्या बॉटलमध्ये सॅनिटायझर भरून विकण्यात येत धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
काही मद्यपिंनी मद्य समजून सॅनिटायझरचे सेवन केल्याची प्रकरणे पुढे आल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. अन्न व औषध प्रशासनाने कारखान्यातील सॅनिटायझरच्या विक्रीवर प्रतिबंध आणून बाजारातील साठा परत बोलविण्यासाठी जयस्वाल यांना निर्देश दिले आणि तयार माल जप्त केला. यातील काही नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. जयस्वाल यांनी चार बॅचेसचा माल बाजारात विक्रीसाठी पाठविला आहे.
सॅनिटायझर बनवून विकताना जयस्वाल यांनी सुरक्षा नियमांचे पालन केलेले नाही. परवाना देताना सॅनिटायझरच्या बॉटल्समध्ये भरून विकण्याचे नियम होते. पण देशी दारूच्या ९० आणि १८० मिलिलिटरच्या बॉटलमध्ये सॅनिटायझर भरून विकण्यात आले. या बॉटल्स विक्रीसाठी बाजारात गेल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या सॅनिटायझरच्या बॉटल कोणत्या परिसरात विकल्या गेल्या आहेत, त्याचा शोध प्रशासनातर्फे घेण्यात येत आहे. बॉटलचे पॅकिंग सॅनिटायझरसारखे नसल्याने मद्यपींकडून मद्य समजून पिण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका होऊ शकतो. हा धोका ओळखून अन्न व औषध प्रशासन विभागाने पोलिसांच्या मदतीने कारवाई केली. सॅनिटायझर तपासणीचा अहवाल आल्यानंतर उत्पादकावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
तपासणीविना बॉटलची परस्पर विक्री
कोरोना व्हायरसमुळे बाजारात सॅनिटायझरचा तुटवडा जाणवू लागल्यानंतर शासनाने मद्य उत्पादकांना सॅनिटायझर उत्पादनासाठी २४ तासात परवाना देण्याचे आदेश दिले. त्यानुसार १५ दिवसापूर्वी देशी दारूचे उत्पादन करणाऱ्या रॉयल ड्रींक्सला सॅनिटायझर निर्मितीचा परवाना शासनाच्या औषध प्रशासन विभागातर्फे देण्यात आला. सॅनिटायझरच्या निर्मितीनंतर पहिली बॉटल विभागाकडे आणून देण्याचे निर्देश दिले होते. पण जयस्वाल यांनी बॉटल आणून न देता आणि तपासणीविना बाजारात परस्पर विक्री सुरू केली. याची विभागाने गंभीर दखल घेतली आहे.
प्रकाश शेंडे, सहआयुक्त (औषध), अन्न व औषध प्रशासन विभाग.